“…तर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत”

मुंबई – नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा विराजमान झाले तर यासाठी त्यांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत असं मत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून मतमोजणीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीतून एनडीए आघाडी पुन्हा एकदा सत्ता काबीज करेल असं चित्र दिसतंय.

मात्र असं असलं तरी एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या जेडी(यु)च्या जागांमध्ये मोठी घट होत असल्याचं आकडेवारीतून समोर येतंय. अशातच बिहार निवडणुकांमध्ये जेडी(यु)च्या जागा कमी झाल्यानंतर देखील भाजपने त्यांना मुख्यंमत्रीपद दिल्यास नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानावेत असं वक्तव्य राऊत यांनी केलंय.

“मी भाजप नेत्यांना नितीश कुमारचा मुख्यमंत्री बनतील असा दावा करताना ऐकलंय. नितीश यांनी यासाठी शिवसेनेचे आभार मानायला हवेत. महाराष्ट्रात शिवसेनेने शब्द न पाळल्यास काय होते हे दाखवून दिल्याने बिहारमध्ये तसं होणार नाही.” असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये शिवसेना व भाजपने एकत्र निवडणुका लढवत बहुमताचा आकडा गाठला होता. मात्र निवडणुकांनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. याबाबत दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही तडजोड होऊ न शकल्याने अखेर सेनेने भाजपसोबत काडीमोड घेतली. या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस अशा भिन्न विचारसरणीचे सरकार अस्तित्वात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.