…तर मग मोदींनाही काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल! 

विनोद तावडेंच्या आरोपाला कॉंग्रेसचे प्रत्युत्तर

मुंबई – सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपाचे नेते, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना कॉंग्रेसने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची त्याचे उत्तर द्यावे, जनता वाट पाहत आहे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते. तसेच पाच वर्षे खोटं बोलून जनतेची फसवणूक केली. त्याबद्दल तर मोदी यांना काळ्या पाण्याचीच शिक्षा द्यावी लागेल, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला सुनावले.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना सचिन सावंत बोलत होते. चव्हाण आणि शिंदे भावनिक आवाहन करत मतं मागत आहेत, विकासकामे केली असती तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती, असा आरोप तावडे यांनी केला होता. विकासकामे केली नसती तर नांदेड महानगरपालिका निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला भरभरून मतं दिली नसती. भाजपने सर्वशक्ती लावूनही नांदेडमध्ये त्यांचे काय झाले हे कदाचित तावडेंना आठवत नसेल, असा टोला सावंत यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सोलापूरचे दोन मंत्री भाजपचे आहेत, महानगरपालिकेवरही भाजपची सत्ता आहे. तरीही शहराला पाच दिवसाआड पाणी पुरवठा का होतो? असा सवाल करीत स्मार्ट सिटीअंतर्गत सोलापुरचा काय विकास केला हेही तावडेंनी सांगावे. सुशीलकुमार शिंदे यांनी काय विकास केला हे सोलापूरच्या जनतेला माहित आहे. भाजपसारखी जुमलेबाजी कॉंग्रेसने केलेली नाही. पराभव दिसू लागल्यामुळे भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. त्यातूनच विरोधकांवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असेही सावंत म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.