नवी दिल्ली – दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेला देशातील जुलूमशाहीच्या विरोधात लढण्याचे आवाहन केले. हुकूमशाहीविरूद्ध सर्व विरोधी पक्ष एकवटल्यास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अवघ्या २४ तासांत तुरूंगाबाहेर येतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने सिसोदिया शुक्रवारी तुरूंगाबाहेर आले. त्यानंतर दिल्लीतील आपच्या मुख्यालयात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधील नव्या घटक पक्षांनाही साद घातली.
विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आणि एनडीएमधील नव्या घटक पक्षांनी हुकूमशाहीविरोधात एकत्र यावे. केवळ स्वपक्षीयांना तुरूंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी नव्हे; तर देशाच्या हितासाठी तसे पाऊल उचलावे, असे आवाहन त्यांनी केले.
भाजपवर टीकेची झोड उठवतानाच सिसोदिया यांनी ईडी आणि सीबीआयलाही लक्ष्य केले. केजरीवाल हे भ्रष्टाचारासाठी काळ आहेत. ते प्रामाणिकपणाचे प्रतीक आहेत. मात्र, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्या विरोधात कारस्थानांचे जाळे विणले.
मात्र, तेही लवकरच तुरूंगाबाहेर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मला ७ ते ८ महिन्यांत न्याय मिळण्याची आशा होती. मात्र, त्यासाठी १७ महिन्यांचा अवधी लागला. अखेरीस सत्याचा विजय झाला.
भगवान के घर देर हैं, अंधेर नहीं हे त्यातून सिद्ध झाले. अनेक व्यावसायिकांना तुरूंगात पाहून मी व्यथित झालो. केवळ भाजपला देणग्या दिल्या नाहीत म्हणून त्यांना बनावट प्रकरणांत गोवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
तुरूंगात वाचली ३०० पुस्तके
तुरूंगात मी सुमारे ३०० पुस्तके वाचली. त्यामध्ये भगवद्गीता आणि जगभरातील शिक्षण व्यवस्थांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचाही समावेश होता. त्यातून मला अनेक उत्तरे मिळाली.
दर्जेदार सरकारी शाळा, आरोग्यव्यवस्था आणि रोजगारांची निश्चिती केल्यास भारत २०४७ या वर्षापर्यंत विकसित देश बनू शकतो याची जाणीव मला झाली. इतर कुणी नेता वेगळी भूमिका मांडत असल्यास त्याला द्रष्टा म्हणता येणार नाही, असे भाष्य सिसोदिया यांनी केले.