बंगळुरू : कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारने निवडणुकांना सामोऱ्या जात असलेल्या राज्यांत पक्षासाठी ७०० कोटी रूपये पाठवले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींना थेट आव्हान दिले. मोदींनी आरोप सिद्ध केल्यास मी राजकीय संन्यास घेतो. मात्र, तसे करता न आल्यास मोदींनी राजकीय संन्यास घ्यावा, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कॉंग्रेसशासित कर्नाटकमधील खंडणी वसुली दुप्पट झाली आहे. त्या राज्यातील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांकडून कॉंग्रेसजनांनी ७०० कोटी रूपये उकळल्याचे आरोप होत आहेत, असा दावा मोदींनी महाराष्ट्रातील एका सभेत केला. तो दावा खोडून काढण्यासाठी सिद्धरामय्या पुढे सरसावले.
देशाचे पंतप्रधान एवढे खोटे बोलतात हे ऐकून मी चकित झालो. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने केलेले आरोप किमान सत्याच्या जवळ जाणारे असावेत. मात्र, मोदींचा दावा सत्यापासून खूपच फटकून आहे. एवढे खोटे बोलणारे पंतप्रधान देशाने कधी पाहिले नाहीत, असे ते कर्नाटकमधील पोटनिवडणुकीसाठीच्या एका प्रचारसभेत बोलताना म्हणाले.