माळशिरस : राज्यात सध्या महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन मंत्र्यांचे खातेवाटपही झाले. यादरम्यान आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले आमदार उत्तम जानकर?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांना अजित पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले “चर्चा या चर्चा राहतात. लोक अजित पवार यांना काही कामानिमित्त भेटायला जात असतील. उत्तम जानकरला सामावून घेण्याइतके अजित पवार यांचे नेतृत्व मोठे आहे का, हे मला पहिल्यांदा तपासावे लागेल. तेवढे मोठे नेतृत्व असेल तर मी अजित दादांबरोबर जाईन. त्यासाठी अजित दादांची कपॅसिटी पहिल्यांदा तपासावी लागेल.” असे उत्तम जानकर म्हणाले.
कोण आहेत उत्तम जानकर?
उत्तम जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार आहेत. २०१९ मध्ये निसटता पराभव स्वीकारलेल्या जानकर यांनी यावेळी भाजपाच्या राम सातपुते यांचा सुमारे १३ हजार मतांनी पराभव केला. यामध्ये विशेष असे की, गेल्या वेळी भाजपाच्या राम सातपुते यांना अकलूजच्या मोहिते पाटलांची साथ असल्याने ते विजयी झाले होते. तर यावेळी जनकरांनाही मोहिते-पाटलांची साथ मिळाली अन् ते विजयी झाले.