…तर ‘त्या’ कारखान्यांच्या विरोधात साखर आयुक्तांकडे दाद मागणार : राजू शेट्टी

इस्लामपूर : शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या सह्या करून एफआरपीत केलेली मोडतोड खपवून घेणार नाही. अशा कारखान्यांना अद्दल घडवून अशा त्यांच्या विरोधात साखर आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा ) येथील सभेत ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, जेष्ठ इतिहासकार प्रा.अरूण घोडके, एस्.यु.संन्दे,  उपसंरपच अशोक दिंडे, सौरभ पाटील, विद्यार्थी परिषदेचे उदय गायकवाड, मौला मुल्ला, हर्षद बुद्रुक, किरण पाटील, संभाजी घोडके उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एफआरपीमध्ये कोणतीही मोडतोड न करता सरसकट पहिली उचल पूर्ण केली. मात्र सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफ्आरपी द्यायचा निर्णय घेतला. पण तो सर्वांनी पाळला नाही. अवघ्या चार कारखान्यानी पुर्ण रक्कम जमा केली आहे.केंद्र सरकारने साखरचे भाव स्थिर ठेवले, इथेनॉलचे भाव वाढविले केंद्र सरकारचे पॅकेज मिळाले असताना या बाबींचा विचार करता मोडतोड करून पहिली उचल पंचवीसशे रुपये दिले आहेत हे शेतकरी हिताचे नाही.

ते म्हणाले, सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या सह्या करून एफआरपीमध्ये मोडतोड केली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सह्याची मोहिम चालू करणाऱ्या साखर कारखान्यांच्या विरोधात साखर आयुक्तांकडे दाद मागणार आहोत. बोगस सह्या करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न साखर कारखाने करत आहेत. याला शेतकऱ्यांनी बळी पडू नये.

कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर आयआरसी प्रमाणे कारवाई केली जाईल. ज्या शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळालेली नाही त्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आपली नावे नोंदवावीत. त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन संबंधित कारखान्यांच्या विरोधात लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

पुणे पदवीधर मध्ये नव्याने आमदार झालेल्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांचा राजू शेट्टी यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना भुरट्या म्हणणारे लाड यांना क्रांतीचा वारसा आहे का ? हा प्रश्न पडतो. शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वर टीका करणे ही लांच्छनास्पद आहे. एका बाजूला पदवीधर निवडणूक लढवताना एकरकमी एफ्आरपी देतो असे आश्वासन देत दिशाभूल केली आहे. तरूण शेतकऱ्यांनी मतदान झाल्यावर लबाड बोलणे हे क्रांतीअग्रणी जी.डी .बापू यांचे पुत्र म्हणून अशोभनीय आहे.’

दरम्यान एफआरपीत मोडतोड करणाऱ्या हुतात्मा, विश्वास, राजारामबापू, वसंतदादा, क्रांती साखर कारखान्याचा निषेध करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.