मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या हा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
या जागेवरून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. यावरच त्यांनी आज पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली आहे. सदा सरवणकर माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना म्हणाले,’ एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीविरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावे. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे, मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे, असं सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं आहे.
यापूर्वी त्यांनी आपलं मत मांडतांना सांगितले होते की,मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेच, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मी माघार घेणार नाही. वेळोवेळी सांगितले आहे मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मला एबी फॉर्म दिलेला आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मी एबी फॉर्म भरलेला आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे. अन्य कोणी माघार घेत असेल तर चौकशी करा, असे त्यांनी स्पष्ट केले होते.