…तर ईश्‍वर तुमचे भले करो; गडकरींचा साखर कारखानदारांना इशारा

पाण्याचा अतिरिक्त वापर हा सामाजिक गुन्हा


“साखर परिषद 20-20’चा समारोप

पुणे – “उसापासून साखरेसोबत पर्यायी उत्पादनांचा विचार कारखान्यांनी वेळीच केला पाहिजे. साखर कारखाने हे महाराष्ट्राचे “ग्रोथ इंजिन’ आहेत. त्यामुळे उसापासून इथेनॉलसारखे उपपदार्थ तयार करण्यावर कारखान्यांनी भर देण्याची आवश्‍यकता आहे. इथेनॉल विकत घेण्यासाठी पारदर्शक, दूरदर्शी धोरण पेट्रोलियम मंत्रालयाने तयार केले आहे. उसापासून केवळ साखर तयार करत राहिलात, तर “ईश्‍वर तुमचे भले करो’ यापुढे सरकार काहीही करू शकत नाही,’ असा सूचक इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिला.

राज्य सहकारी बॅंकेने आयोजित केलेल्या “साखर परिषद 20-20’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री व खासदार शरद पवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी विरोधीपक्षनेते दिलीप वळसेपाटील, बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मंडळाचे सदस्य संजय भेंडे, अविनाश महागांवकर, साखर आयुक्त डॉ. शेखर गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी, साखर कारखान्यांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

“साखरेच्या जादा उत्पादनामुळे कारखाने अडचणीत आले आहेत. यापुढे साखर उत्पादनाला भवितव्य नाही’ असा इशारा देत गडकरी म्हणाले, “ब्राझीलमध्ये सध्या 22 रुपये किलोने साखर मिळत आहे. अशावेळी भारताची 32 रुपये किलो साखर कोण घेणार? त्यामुळे साखरेऐवजी पर्यायी उत्पादनाचा विचार केला पाहिजे. देशात पाण्याची कमतरता नाही, मात्र त्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर हा सामाजिक गुन्हा आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणण्याची आवश्‍यकता आहे. तसेच साखर कारखान्यांनी खर्च कमी करण्यासाठी बायोडिझेल इंधन आणि बायो सीएनजी वापरावर भर द्यावा. बंद पडलेले आणि आजारी साखर कारखान्यात शुगरकेन ज्यूस ते इथेनॉल निर्मिती यावर भर देण्यासाठी नवे धोरण तयार करण्याचे काम सरकार करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, “साखरेपासून इथेनॉल किती प्रमाणात करावे हे ठरवणे गरजेचे आहे. सध्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर पडून आहे. त्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत सापडले असून, वेळीच कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकार घेईल, अशी आशा आहे. कारखान्यांनी कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करावा. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे, ती आवाक्‍यात आणावी. तसेच पाणी वापर कमी करताना बीटपासून साखर निर्मितीचा विचार करावा.’

साखर उद्योगात पडू नका
साखर उद्योगात मी अपघाताने आलो. काही वर्षांच्या अनुभवानंतर यशस्वी झालो. साखर उद्योगात पश्‍चिम महाराष्ट्र हा मेरिटमधील विद्यार्थी आहे. मराठवाडा फर्स्ट क्‍लासमध्ये, तर विदर्भ “नापास’मध्ये जमा होतो. म्हणून माझ्याकडे कोणी साखर कारखाना सुरू करण्यासाठी विचारायला आले, तर हा उद्योग करू नको, असा सल्ला मी देतो, असे सांगून नितीन गडकरी यांनी साखर व्यवसायातील कठीण परिस्थितीची जाणीव करून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.