न्यूयॉर्क : जगात सध्या कोरोनाच्या साथीने सगळीकडे हाहाकार माजवला आहे तर दुसरीकडे जागतिक राजकारण देखील सुरु असल्याचे दिसत आहे. कारण जर चीन विकसनशील देश असेल तर मग अमेरिकेलाही विकसनशील देश हाच दर्जा द्या, अशी उपरोधिक टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. विकसनशील देश या आपल्या दर्जाचा चीनकडून गैरफायदा घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये दैनंदिन पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली. चीनने आपल्या आणि इतर देशांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला आहे. तुम्हाला तर माहिती आहे की ते स्वतःला विकसनशील देश समजतात. मग आता आम्हाला सुद्धा विकसनशील देशच म्हणा. विकसनशील देश असल्यामुळे त्यांना अनेक फायदे मिळतात. भारतसुद्धा विकसनशील देश आहे. आम्हीच विकसित देश आहोत. पण आता आम्हाला सुद्धा खूप विकास करायचा आहे, असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या मदतीने चीनने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व मिळवल्यावर त्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे गेली, असे सांगून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जर तुम्ही चीनचा इतिहास बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की, ज्यावेळी त्यांनी जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व घेतले त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आलेख उंचावला. पण त्यापूर्वी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आलेख खूप वर्षे सपाटच होता.