वडगाव मावळ – मावळातील नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकतर्फी घड्याळाच्या चिन्हवर चालवून बहुमत द्या, विकासकामांबाबत मागाल ते देतो. क्रीडा संकुले, रस्ते देण्याचे आश्वासन देण्याबरोबरच सगळे सदस्य निवडून दिल्यास पुणे जिल्हा परिषदेतील पहिली चार महत्त्वाची पदे देण्याचा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळवासीयांना दिला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामासह मावळातील एकूण 108 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे झाले. त्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, अंजलीराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, जिल्हा बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, बाबुराव वायकर, वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर भेगडे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, संतोष भेगडे, महिला तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, सारिका शेळके, उद्योजक शंकरराव शेळके, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, संजय बाविस्कर, राजेश सांडभोर, प्रशांत भागवत, सुनील दाभाडे, चंद्रकांत दाभाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके यावेळी बोलताना म्हणाले, की, राष्ट्रवादीत सध्या एन्ट्री, इनकमिंग चालू आहे. राज्य पवारमुक्त करू म्हणणारे स्वतः मुक्त झाल्यासारखे वाटते. तळेगाव लोणावळा नगरपरिषदेत पुढचा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल हा विश्वास देतो.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीची बेरीज वाढते आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढताहेत. पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. मतांचा बोजा पाहून नेटाने काम केले पाहिजे असे वाटते. जनतेचा पैसा खर्चून बांधले जाणारे रस्ते आणि रस्ता प्रशासकीय इमारत चांगलीच झाली पाहिजे हाच आमचा कटाक्ष आहे. उद्योगांच्या धर्तीवर मावळातील पर्यटनाला पोषक वातावरण तयार झाले पाहिजे.
दळणवळणाची किफायतशीर साधने नव्या पिढीसाठी तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. येत्या आषाढी वारीचे काम चोख झाले पाहिजे, कुणाला अडचण यायला नको असे नियोजन चालू आहे. आमदार शेळकेंच्या रुपाने मजबूत लोकप्रतिनिधी मावळला मिळाला आहे. ओबीसी आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वजण लक्ष
देत आहेत.
लिंब फाटा येथे रॅली
मेळाव्यापूर्वी अजित पवार यांचे लिंब फाटा येथे स्वागत करून मोटारीतून भव्य रॅली काढण्यात आली होती. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दशमी समिती मंदिरासाठी चंद्रकांत दाभाडे यांच्यातर्फे 11 लाखांचा धनादेश दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्याकडे सुपूर्द केला. वडेश्वर आश्रम शाळेस 11 कोटी निधी दिल्याबद्दल आदिवासी सेल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष किरण हेमाडे आणि बिरसा ब्रिगेडच्या वतीने उपमुख्यमंत्री पवार यांचा खास धनुष्यबाण देऊन सत्कार करण्यात आला. सत्येंद्रराजे दाभाडे, वृशालीराजे दाभाडे,सत्यशीलराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे, देहूतील भाजपच्या एकमेव नगरसेविका पूजा काळोखे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या वेळी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
===================