नवी दिल्ली – महेंद्रसिंग धोनीवर जर कर्णधारपदाची जबाबदारी टाकली नसती तर, तो तिसऱ्या क्रमांकावरचा सर्वात यशस्वी आणि विक्रमादित्य फलंदाज बनला असता, असे मत भारताचा माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्य केले आहे.
प्रत्येक संघातील तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज दुहेरी भूमिका निभावत असतो. पहिला गडी लवकर बाद झाला तर संघाचा डाव सावरायचा तर असतोच पण त्याचवेळी गोलंदाजी डोईजड होऊ नये यासाठी आक्रमक खेळही करायचा असतो. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी धोनी सर्वात जास्त सक्षम होता. त्यावेळी त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निश्चित केले गेले असते तर जागतिक क्रिकेटला पूर्णपणे वेगळा धोनी पाहायला मिळाला असता. तो भारतीय संघाचा सध्याच्या काळातील विक्रमादित्य फलंदाज म्हणून नावारूपाला आला असता, असे गंभीरने सांगितले.
धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विक्रम साकार केले आहेत. मात्र, एक कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी शिरावर असल्यामुळे त्याच्यातील फलंदाजाला न्याय मिळाला नाही. तो फिनिशर तर आहेच, पण त्याला कर्णधारपद व यष्टिरक्षकाचा भारही वाहावा लागल्याने त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करता आले नाही. त्याच्या नावापुढे जे विक्रम आसायला हवे होते ते दिसत नाहीत. देशाने सुनील गावसकरांनंतर आणखी एक विक्रमादित्य फलंदाज पाहिला असता, अशा शब्दांत गंभीरने धोनीचे कौतुक केले आहे.