मुंबई : परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे संसदेत चांगलेच पडसाद उमटले. भाजपा खासदारांबरोबरच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत गंभीर आरोप केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप केला. तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. या सर्व आरोपांवर सावंत यांनी उत्तर दिले आहे. त्याचबरोबर शिवसेनेवर त्यांचा राग असण्याच्या कारणांचाही त्यांनी उलगडा केला.
या वादावरून राजकारण चांगलेच तापले असून नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. त्यांनी नवनीत राणा ट्विट करत नवनीत राणा याना पाठिंबा दिला आहे तर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ आणि नवनीत कौर यांना सल्ला दिलाय.
नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
‘महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या नावाचा वापर करून तुम्ही ज्यांना पाठीशी घालत आहात त्यांना एकच प्रश्न विचारा चित्रा वाघ की आज तुम्ही गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या हक्काचा GST निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले, महाराष्ट्रात राहुन शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा PM Care Fund ला मदत केली जे आज हिशोब मागितला तरी द्यायला तयार नाहीत यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही..’
त्या पुढे म्हणाल्या,’नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा , कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे.’