पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) -सायलेन्सर बदलल्यामुळे बुलेटस्वारावर वाहतूक पोलिसांनी एकदा कारवाई केली असल्यास आणि पुन्हा दुसऱ्यांदा बुलेटस्वाराने सायलेन्सर बदलल्याचे आढळल्यास त्याची बुलेट जप्त केली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल करून न्यायालयात पाठविणार, असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त आनंद भोईटे यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली.
बुलेटचा मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावण्याचे फॅड सध्या तरुणाईमध्ये आहे. तसेच काही टवाळखोर बुलेटस्वाराकडून फटाक्यासारखा मोठा आवाजही केला जातो. यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, यांना याचा त्रास तर होतोच, परंतु फटाक्याच्या या आवाजामुळे इतर वाहन चालकही बिचकतात. अशा बुलेटस्वारांवर पोलिसांकडून कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी होती. या मागणीची दखल घेत तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वाहतूक पोलिसांना सायलेन्सर बदलणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई आदेश दिले होते. सुरुवातीला वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर बदलणाऱ्या बुलेटराजांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र त्यानंतरही बुलेटला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविण्याचा उद्योग टवाळखोरांकडून सुरू होता.
हजारो सायलेन्सर जप्त
कारवाईच्या दुसऱ्या मोहिमेत दंडात्मक कारवाई सोबतच बुलेटचा सायलेन्सर काढून घेण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली. या कारवाईत हजारो सायलेन्सर वाहतूक पोलिसांकडे जमा झाले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाल्यावर पुन्हा बुलेटस्वारांनी मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविण्यास सुरवात केली. आजही मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून बुलेटस्वार फिरत आहेत.