…तर आयुक्तांच्या तोंडाला काळे फासू

दत्ता साने यांचा इशारा; न्यायालयात दावा दाखल करणार
पिंपरी –
महापालिकेच्या नियोजित पदव्युत्तर महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून नियुक्‍त करण्यात आलेल्या डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे देण्यात आलेला वायसीएम रुग्णालयाचा पदभार हा केवळ भ्रष्टाचारासाठी देण्यात आला आहे. रुग्णसेवेपेक्षा या ठिकाणी आर्थिक हितसंबंधाला अधिक महत्त्व आले असून डॉ. वाबळे यांच्याकडील कार्यभार तत्काळ काढण्यात यावा. अन्यथा आयुक्‍तांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.

महापालिकेतील कामकाज सोडून पक्षनेते एकनाथ पवार आणि स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी हे वायसीएम रुग्णालयात सातत्याने फेऱ्या का मारतात? हीच बाब धक्कादायक आहे. विशेष म्हणजे हे दोघे गेल्यानंतर वायसीएमचे डॉक्‍टर आणि महत्त्वाचे अधिकारी यांच्या स्वागतासाठी रुग्ण आणि काम सोडून उपस्थित राहतात. पवार आणि मडिगेरी यांच्या वायसीएममधील वाढलेल्या फेऱ्यांचे गौडबंगालही आपण उघडे करू, असा इशाराही साने
यांनी दिला.

डॉ. वाबळे यांची नियुक्‍ती व त्यांच्याकडील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा पदभार याबाबत दैनिक “प्रभात’मध्ये शनिवारी सविस्तर वृत्त प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल विविध पक्षांच्या नगरसेवकांनी आज घेतली. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील इशारा दिला. पुढे बोलताना ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी महापालिकेत चालविलेला बेधुंद कारभार हेच डॉ. वाबळे यांच्या नियुक्‍तीतून समोर आले आहे. सत्ताधाऱ्यांची दुकाने चालविण्यासाठी प्रशासन आणि आयुक्‍तही या कारभाराला खतपाणी घालत आहेत.

वायसीएम रुग्णालय आणि पदव्युत्तर महाविद्यालय या वेगवेगळ्या घटक संस्था आहेत. ज्या पदासाठी वाबळे यांना घेतले आहे त्याच पदावर त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. वायसीएम रुग्णालयाचे प्रमुखपद हे स्थायी स्वरुपाचे असून मानधनावरील व्यक्‍तीची कायद्याने या पदावर नियुक्‍ती करता येत नाही. मात्र सत्ताधारी भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांचे या नियुक्‍तीमध्ये हात गुंतले असून डॉ.वाबळे यांच्या माध्यमातून या दोघांना वायसीएममध्ये आपली दुकानदारी चालवायची आहे.

ठेकेदारी, टेंडर आणि आर्थिक विषय डॉ. वाबळे यांच्या माध्यमातून रेटण्यासाठीच हा प्रकार सुरू असून आयुक्‍तांचेही हात या प्रकारात गुंतल्याचा आरोप साने यांनी केला. महापालिकेत आस्थापनेवर नियुक्‍त असलेला एकही अधिकारी वायसीएम चालविण्यासाठी सक्षम नाही का? असा प्रश्‍न उपस्थित करून साने म्हणाले, सत्ताधारी पदाधिकारी आयुक्‍तांनी केलेल्या नियुक्‍तीच्या विरोधात आपण न्यायालयात दावा दाखल करणार आहोत. डॉ. वाबळे यांची कुंडलीही आपण येत्या सर्वसाधारण सभेत सभागृहासमोर मांडणार असल्याचेही साने म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)