नगर – महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेला अधिकारी उपस्थित राहत नसल्याने सभापती कुमारसिंह वाकळे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शिस्तीचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढे कारवाई करा, असे आदेश त्यांनी दिले. अधिकारी कोणतीही परवानगी न घेता सभेला हजर राहत नाहीत. ते त्यांची स्वतःची कामे करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत यापुढे नोटीसा काढा, असेही सभापती वाकळे यांनी सांगितले.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती वाकळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महापालिकेत अनेक कामे प्रलंबित राहतात. अनेक महिने फाईल पुढे सरकत नाही.
त्यासाठी ज्या विभागाला अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. त्या विभागाला मानधनावर किंवा ठेकेदारामार्फत कर्मचारी नेमणूक करा. काही उमेदवारांच्या मुलाखती झाल्या मात्र त्यांना अजूनही नेमणुका मिळालेल्या नाहीत. याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. पाणीपुरवठ्याचे काही कर्मचारी नगरसेवकांचे फोन रेकॉर्ड करतात असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचे कारण काय, असा सवाल नगरसेवकांनी केला. त्यावर यापुढे कर्मचाऱ्यांना लेखी समज देण्यात येईल, असे उपायुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.