…तर तीन महिन्यांत सरसकट कर्जमाफी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्‍वासन

वाडा – राज्यात आमचे सरकार आले तर तीन महिन्यांत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले.

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील याच्या प्रचारार्थ वाडा येथे आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते.

यावेळी पक्षाचे स्टार प्रचारक ज्येष्ठ नेते अमोल मिटकरी, उमेदवार दिलीप मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, संचालक बाबा राक्षे, विनायक घुमटकर, कॉंग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा वंदना सातपुते, जीप सदस्या निर्मला पानसरे, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर, सुरेश शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा मोहिते, अरुण चांभारे, दत्ता खाडे, जाकीर तांबोळी, बाळासाहेब गोपाळे, काळुराम सुपे, कैलास सांडभोर, संध्या जाधव,विलास कातोरे, नवनाथ होते, अशोक राक्षे, सतीश राक्षे, धारू गवारी विठ्ठल वनघरे, गणपत विरनक यांच्यासह पश्‍चिम भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, निवडणूक आल्याबरोबर माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर गुन्हे दाखल करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न येथील आमदारांनी केला मात्र तो अयशस्वी ठरला आहे. दिलीप मोहिते यांनी दहा वर्षाच्या काळात तालुक्‍याचा मोठा विकास साधला मात्र जनतेने त्यांना पुन्हा संधी न दिल्याने तालुका पाच वर्षे मागे गेला आहे. त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने पक्ष उभा आहे तुम्ही देखील उभे राहा आणि तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधा असे आवाहन केले.

तुमचा खासदार मी पळवला…
मोदी यांच्यावर टीका करीत असताना अचानक लाईट गेली त्यावर जयंत पाटील म्हणाले की, मोदींचा विषय निघाल्यावर लाईट जाते पण शरद पवार यांच्या भीतीने परत येते असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच उत्साह संचारला तर या मतदारसंघाचे खासदार कुठे गेले याचे स्पष्टीकरण देताना पाटील यांनी सांगितले की, तुमचा खासदार मी पळवला आहे.

तो राज्यातील सत्ता खेचुन आणण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात दौरे करीत आहे. डॉ. अमोल कोल्हे हे अनमोल रत्न पक्षाला मिळाले आहे. निवडणुकीनंतर आपल्या तालुक्‍यात ते येथील त्यांच्यावर कुणीही नाराज राहू नये.

पाच वर्षांत येथील लोकप्रतिनिधी कधी लोकांमध्ये मिसळले नाहीत. विकासकामे केली नाहीत, विकासकामे आणि सुख-दुःखात सहभागी झाले, तर जनता डोक्‍यावर घेतल्या शिवाय राहणार नाही. खेडच्या आदिवासी भागातील नागरिकांना विविध योजना शासन देते; मात्र त्या राबविण्यात आमदार सुरेश गोरे अपयशी झाले आहेत. पाच वर्षे जनतेने संधी दिली; मात्र तालुक्‍याचा विकास करता आला नाही. असा लोकप्रतिनिधी काय कामाचा? आता पुन्हा विकासाची संधी चालून आली आहे. तुम्ही मला साथ द्या, या संधीचे मी सोने करेल.

– दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार

Leave A Reply

Your email address will not be published.