चोरी, लुटमारीत वाढत पास रखडलेलाच

20 दिवसांत : 47 चोऱ्या; 21 लुटमारीच्या घटना

पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी, चोऱ्या आणि लुटमारीच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्याचा विचार केला तर या 20 दिवसांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रोज चोरीच्या घटना घडत असून, चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना यश येत नाही.

20 दिवसांत आयुक्तालय हद्दीमध्ये चोरी व घरफोडीच्या 47 तर जबरी चोरी म्हणजे रोड रॉबरीच्या 21 घटना घडल्याचे आकडीवारीवरुन समोर होत आहे. “रोड रॉबरी’चा हा आकडा नोंद झालेला आहे. पोलिसांपर्यंत न पोहचलेल्या किंवा नोंद न झालेला आकडा यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना गुन्ह्यांची उकल करण्यात मात्र पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील नागरिकांना आपले घर बंद करून एखादा दिवस बाहेरगावी जाणेही चिंतेचे वाटते. बाहेरगावी गेल्यानंतर माघारी येईपर्यंत आपल्या घरातील किंमती वस्तू सुरक्षित राहतील की नाही याची सतत काळजी असते. केवळ घरच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये दुकाने फोडण्याचा चोरट्यांनी सपाटाच लावला असल्याने व्यापारी वर्ग देखील चिंतेत आहे. एवढ्या चोऱ्या होऊन पोलिसांना चोर सापडतच नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली काही महिने चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करून लाखो रुपयांची रोकड आणि किंमती मुद्देमाल लंपास केला. चोरी झाल्यानंतर चोरटे सापडतील आणि चोरीस गेलेला ऐवज मिळेल या आशेपोटी
नागरिक पोलिस ठाण्यात धाव घेतात, मात्र गुन्ह्याची उकलच होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

“ही’ पथके करतात तरी काय?
पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाणे असतानाही गुन्हेगारी रोखण्यासाठी कित्येक पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांचे मुख्य काम अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील आरोपींना शोधून काढणे आणि गुन्ह्यांची उकल करणे, एवढेच असते. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असताना ही पथके नेमकी करतात तरी काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. महिन्यातून एक-दोन आरोपी पकडून मोठी टोळी पकडल्याचा आव आणत वेळ मारुन नेत असल्याचे विदारक चित्र आहे.

रोज तीनपेक्षा अधिक गुन्हे
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीचा विचार केला तर जुलै महिन्यातच आत्तापर्यंत चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या 20 दिवसांत 68 घटनांची नोंद झाली. जवळपास रोज तीनपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद होत आहे. सर्वांत आश्‍चर्याची बाब म्हणजे गुन्ह्याची नोंद होताना आरोपीच्या रकाण्यात अज्ञात किंवा अनोळखी हा शब्द लिहलेला असतो, तो तसाच कायम राहत असल्याचे चोरट्यांना आणि वाटमाऱ्या करणाऱ्या गुंडांना हे शहर मोकळे रान झाले आहे. एकूण दाखल गुन्ह्यापैकी केवळ हाताचा बोटावर मोजण्याइतकेच गुन्ह्याची उकल पोलिसांनी केलेली आहे. दरोड्याचे गुन्हे वगळता उर्वरित सर्व गुन्ह्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)