डीएसके यांच्या जप्त मालमत्तांतून किमती ऐवजांची चोरी

आतापर्यंत 5 लाख रुपयांवर साहित्याची चोरी

पुणे – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या डीएसकेंच्या जप्त मालमत्ता आणि वाहनांमधून चोरटे किमती ऐवज चोरून नेत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

2017 पासून आतापर्यंत 5 लाखांहून अधिक माल चोरीला गेला आहे. याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे राहुल शितोळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डीएसके आणि त्यांच्या कंपन्यांवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दीपक कुलकर्णी, पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष यांच्यासह 11 जणांना अटक केली. या गुन्ह्यात पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील तबल 463 मालमत्ता जप्त केल्या आहेत. तसेच वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्ता आणि वाहने सील करण्यात आली आहेत.

फुरसुंगी भागात डीएसके यांचा ग्लोबल एज्युकेशन व वॉटरफॉल रेसिडेन्सी हा बहुमजली प्रकल्प आहे. हा प्रकल्पदेखील सील करण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार आणि सहायक निरीक्षक सुनील गवळी यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. त्यावेळी या प्रकल्पातून एसी, पंखे, टीव्ही, बेड, कपाट, सीसीटीव्ही, संगणक, मॉनिटर तसेच कॅंटीनमधील फ्रीज, टेबल गॅस, कूलर असा 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे आढळून आले.

वाहनांचीही तोडफोड
इमारतीच्या आवारात जिप्सी, इनोव्हा, पॅगो, स्कूटी, इटॉस, बस, जीप अशी सुमारे दहा वाहने आहेत. त्यांचीही तोडफोड करण्यात आली असून वाहनांतील महत्वाच्या वस्तूंची चोरी देखील करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर सिमेंट, वाळू, स्टील, ब्लॉक्‍स आदींचीही चोरी करण्यात आली. या चोरीच्या ऐवजांची यादी नंतर करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.