वाघोली (पुणे) – वाघोलीतील केसनंद फाटा पोलीस चौकीमध्ये ठेवण्यात आलेली जुनी, जप्त व अपघातातील वाहने पोलिसांनाच डोईजड होऊ लागली आहेत. येथील वाहनांचे स्पेअर पार्ट चोरी जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे या वाहनांचा निपटारा करण्याची गरज आहे.
वाघोली येथील केसनंद फाटा येथे चौकीत अनेक छोट्या मोठ्या अपघातातील तसेच गुन्ह्यातील दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. कोर्टाच्या भानगडीत न पडणाऱ्या तर काही वाहनांच्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा जीव गमावला असेल तर त्यांच्या घरचे ते वाहन घेण्यासाठी येत नाहीत. कायद्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना आपले वाहन कसे परत मिळवायचे ते माहीत नसल्याने अनेक वाहने धूळखात पडलेली आहेत. दिवसेंदिवस या वाहनांच्या संख्येत वाढच होत आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक प्रमाण दुचाकींचे आहे. येथील अनेक वाहनांना गंज लागून ती जागेवरच सडून गेली आहेत. तर चांगल्या वाहनांचे स्पेअर पार्ट गायब झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस चौकीच्या आवारात उभी असलेल्या वाहनापैकी नव्वद टक्क्यांहुन अधिक वाहने भंगारात जमा करण्याच्या अवस्थेत आहेत. तर बहुतांश वाहनांचे टायर, बॅटरी व इतर स्पेअरपार्ट गायब झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच पोलिस ठाण्याच्या आवारात वर्षोनुवर्षे उभ्या असलेल्या वाहनांचा निपटारा करावा अशी मागणी नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.
<
blockquote>एक एक रुपया जमा करून कष्टाने घेतलेली वाहने मूळ मालकांना परत मिळवण्याची प्रक्रिया माहीत नसल्याने तसेच कोर्ट कचेरीच्या भीतीने येथे सडून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा वाहनांबाबत पोलिसांकडून जनजागृती होणे गरजेचे आहे.
– ऍड.अनिल हरगुडे