पुणे – आमदार माधुरी मिसाळ यांच्या रहात्या घरातून 18 लाखाच्या दागिण्यांची चोरी झाली. याप्रकरणी त्यांची जावु ममता दिपक मिसाळ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लग्नात घालण्यासाठी काढलेले दागिने बेडरुमच्या तिजोरीवर ठेवले असता चोरण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी ममता मिसाळ या वानवडी येथील फेअर रस्त्यावरील दोन नंबरच्या बंगल्यात रहातात. त्यांच्या सोबत पती, मुले आणी जाऊ आमदार माधुरी मिसाळ व त्यांची दोन मुले असे एकत्र रहातात. बंगल्यामध्ये काम करण्यासाठी सात महिला कामगार ठेवल्या आहेत. यातील काही महिला ममता यांच्या बेडरुममध्ये साफसफाईचे काम नियमीतपणे करतात.
28 नोव्हेंबर रोजी ममता या लग्नात दागिणे घालण्यासाठी तिजोरीवर ठेवलेला सोन्याच्या दागिण्यांचा बॉक्स काढण्यासाठी गेल्या. मात्र त्यांना तेथे बॉक्स सापडला नाही. या बॉक्समध्ये सोन्याचा हिरे मढवलेला 14 लाखाचा हार आणी एक सोन्याचे हिरे व मोती मढवलेले चार लाखाचे ब्रेसलेट होते. याप्रकारे 18 लाखाचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.