ससूनमधून रेमडेसिविर इंजेक्‍शनची चोरी

पुणे  -करोनाबाधित रुग्णांना देण्यासाठी आणलेल्या एका रेमडेसिविर इंजेक्‍शनची ससून रुग्णालयातून चोरी झाली. सात नंबरच्या इमारतीत ही चोरी झाली.

याबाबत रुग्णालयातील 57 वर्षीय परिसेविकेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या ससून रुग्णालयात कोविड बिल्डिंग सातमध्ये कार्यरत आहेत. तेथे त्यांच्यासोबत असलेल्या महिला अधिपरिचारिकेने करोना रुग्णांना देण्यासाठी 1 मे रोजी रेमडेसिविर इंजेक्‍शन मागविले होते. इंजेक्‍शन रात्री उशिरा आल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या एका परिचारिकेने ते रुग्णाला दिले.

रुग्णालयात आलेल्या व्हायलमध्ये दोन इंजेक्‍शन होते. त्यामुळे उरलेले एक इंजेक्‍शन परिचारिकेने व्हायलमध्येच ठेवले. परिचारिका रविवारी (दि. 2) दुपारी दुसरे इंजेक्‍शन घेण्यासाठी गेल्या असता त्यांना व्हायलमध्ये इंजेक्‍शन आढळले नाही. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी इजेक्‍शनचा शोध घेतला मात्र ते मिळून न आल्याने फिर्याद देण्यात आली आहे. या इंजेक्‍शनची किंमत 1200 रुपये होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक हरीष ठाकूर करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.