सातारा – रामाचा गोट येथील गुरुज्योती अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये झालेला चोरीचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने 24 तासांत उघडकीस आणला आहे. याप्रकारणी सायली प्रणव पवार व एका सोनाराला ताब्यात घेऊन पोलिसांनी सोन्याचे दागिने व रोकड जप्त केली आहे.
रामाच्या गोटातील गुरुज्योती अपार्टमेंटमधील एक कुटुंब घर बंद करुन आणि कुलपाची चावी शेजारी ठेवून दि. 10 रोजी गावाकडे यात्रेला गेले होते. घरातील कपाटामध्ये ठेवलेले अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 16 हजार रुपये रोख चोरीस गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. हा गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना दिल्या. पोलीस निरीक्षक पतंगे यांनी ही जबाबदारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि प्रशांत बधे व कर्मचाऱ्यांवर सोपवली.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी संशयितांची चौकशी करत असताना, यापूर्वी चोरीची तक्रार दाखल असलेली एक महिला त्या अर्पामेंटमध्ये राहायला आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित महिलेस चौकशीसाठी पोलीस ठाण्यास आणले. तेथे चौकशीत त्या महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिला विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यावर तिने चोरीची कबुली दिली. या चोरीतील सोने एका सोनाराकडे गहाण ठेवल्याचेही तिने सांगितले. त्यानुसार त्याला सोनाराला ताब्यात घेऊन, पोलिसांनी त्याच्याकडून 25 ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिने आणि संशयित महिलेकडून 16 हजार रुपये रक्कम जप्त केली.