नवी दिल्ली -ओडिशातील बालासोर ट्रेन दुर्घटनेनंतर असे अनेक लोक आहेत जे आपल्या प्रियजनांपासून विभक्त झाले आहेत. अशात या अपघातात जखमी झालेल्या नेपाळमधील मुलाची अखेर त्याच्या आई-वडिलांशी भेट झाली. रामानंद पासवान असे या मुलाचे नाव आहे. पासवान यांच्यावर कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
रामानंद हे त्यांच्या तीन नातेवाईकांसह कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होते. रामानंदचे वडील हरी पासवान यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा रामानंद आपल्या तीन नातेवाईकांसह ट्रेनमधून प्रवास करत होते. 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात रामानंद गंभीर जखमी झाले होते, तर अन्य तिघांचा मृत्यू झाला होता.
रेल्वे अपघातानंतर भारतात आलेल्या रामानंदची कोणतीही माहिती नेपाळमध्ये राहणाऱ्या त्याच्या पालकांना मिळाली नाही. यानंतर आई-वडील आपल्या मुलाच्या शोधात नेपाळहून ओडिशात आले. तिघांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर हरी आणि त्याची पत्नी आपला मुलगा रामानंदसाठी चिंतेत होते. दरम्यान, एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल रामानंद यांना शुद्ध आली. एका टीव्ही वृत्तवाहिनीवर त्याने आपल्या पालकांना पाहिले आणि अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर प्रशासन सतर्क झाले.
मुलाच्या शोधात असलेल्या आई वडिलांना एससीबी मेडिकल महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मुलाला शोधण्यात मदत केली. अखेर चार दिवसानंतर या मुलाची आणि त्याच्या पाल्ल्यांची भेट झाली. एससीबी मेडिकल कॉलेजने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बालासोर ट्रेन दुर्घटनेत बळी पडलेल्या नेपाळमधील रामानंद पासवान या १५ वर्षीय मुलाला त्याच्या पालकांना भेटता आले हा आमच्यासाठी भावनिक क्षण आहे.