उस्मानाबाद : तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि कामाची जिद्द असे व्यक्तीमत्व देशात सध्या एकच आहे ते म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. त्यांचा नुकताच आपला 80वा वाढदिवस साजरा केला. राजकारणाच्या आखाड्यातील कसलेला मल्ल म्हणून पवारांचा उल्लेख केला जातो तो उगाच नाही, याचा प्रत्ययही यंदाच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या दिवसांमध्ये दिसला.
शरद पवार यांना त्यांच्या यंदाच्या वाढदिवसानिमितताने खास अंदाजात शुभेच्छा देण्यात आल्या. या शुभेच्छा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला आणि कार्याला साजेशा ठरत आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण, या शुभेच्छा जोडल्या गेल्या आहे शेतीशी.
निपाणी, उस्मानाबाद येथील मंगेश निपाणीकर या तरुण शेतकऱ्याने हरभरा, आळीव, ज्वारी, मेथी, गहू या पिकांपासून शरद पवार यांची भव्य प्रतिमा आपल्या शेतातच साकारली आहे. पिकांच्या माध्यमातून तब्बल चार एकरांच्या भूखंडावर साकारण्यात आलेली शरद पवार यांची ही विक्रमी प्रतिमा सध्या अनेकांच्याच आकर्षणाचा विषय ठरत आहे. मंगेश निपाणीकर याने पवारांची ही प्रतिमा साकारण्यासाठी शंभर दोनशे नव्हे, तर किलो बियाण्यांचा वापर केला आहे.
एक भव्य गोल रिंगण (पिकांचं), त्यामध्ये आणखी एक रिंगण ज्यामध्ये अतिशय सुरेख अशा पद्धतीने शरद पवार यांच्या चेहऱ्यावरील बारकावे टीपत ही प्रतिमा आकारास आली आहे. ज्याखाली साहेब अशी अक्षरही लिहिली गेली आहेत. ही अतिशय कलात्मकतेने साकारण्यात आलेली ही प्रतिमा म्हणजे कलात्मकता आणि शेतीचं सर्वोत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही.