तरुणीला मिळाली लग्नापूर्वीच अनोखी भेट

अपस्मारच्या आजारापासून झाली सुटका

पिंपरी – एकवीस वर्षीय तरुणीला अपस्मारच्या आजाराने ग्रासले होते. अशा परिस्थितीत तिचा नुकताच साखरपुडा झाला. त्यानंतर आदित्य बिर्ला रुग्णालयात अपस्माराच्या (एपिलेप्सी) आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून असलेल्या आजारातून तिची कायमची सुटका झाली. त्यामुळे ऑगस्टमध्ये ठरलेल्या लग्नापूर्वीच तिला ही एक अनोखी भेट मिळाली आहे.

पैठणजवळील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या गीताला (नाव बदलले आहे) वयाच्या सातव्या वर्षापासून अपस्माराचा प्रचंड त्रास होता. पैठण, औरंगाबाद, अहमदनगर आणि पुण्यातील विविध रूग्णालयांमध्ये त्यासाठी उपचार करण्यात आले. तिला बरे करण्यासाठी आजवर बराच खर्च करण्यात आला. यातून फक्त तिच्या औषधांच्या यादीत थोडेफार बदल झाले. तिला सतत औषधे घ्यावी लागणार, याचे आम्हाला दु:ख होते. आजवर कुणीही “हा त्रास कायमचा बंद होईल’ असे म्हणाले नव्हते. औषधांशिवाय इतर काही पर्यायांचा कुणी कधी विचारही केला नाही,’ असे गीताच्या वडिलांनी सांगितले.

गीता म्हणाली, “मला दिवसातून चार ते पाच वेळा आकडी यायची. मला कोणीही काही चुकीचे बोलले, कोणी माझ्यावर ओरडले की माझे डोके दुखू लागायचे. उलट्या व्हायच्या आणि आकडी येऊन मी खाली पडायचे. मला शाळेत, महाविद्यालयात अगदी रस्त्यावरही आकडी यायची. शिक्षक, विद्यार्थी, काही वेळा तर रिक्षावाल्याने देखील तिला मला मदत केली. या परिस्थितीत पाहणे, मला आवडत नव्हते. अपस्मारापासून झालेली सुटका ही माझ्यासाठी ही लग्नापूर्वी मिळालेली खास भेट आहे.’गीता सध्या एम.ए. करते आहे. तिचा नुकताच साखरपुडा झाला असून ऑगस्ट महिन्यात लग्न होणार आहे. पुण्यातील एका रूग्णालयामध्ये ती आली असताना डॉक्‍टरांनी तिला बिर्ला रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तिच्या डोक्‍यावर सहा तास शस्त्रक्रिया करून अपस्मारापासून मुक्तता देण्यात आली.

गीताची तपासणी केल्यानंतर आम्हाला कळले की तिला कॉम्प्लेक्‍स पार्शिअल सीझर आहे. म्हणजे अशा प्रकारचे आकडी जी मेंदूच्या एका भागामुळेच येते. संपूर्ण मेंदूला त्रास होत नाही. आकडीमुळे रुग्णाचे भान सुटते आणि त्याची शुद्ध हरपते. या आकड्यांमुळे तिच्या मेंदूतील टेम्पोरल लोब संकुचित झाला होता. तो शस्त्रक्रिया करून दूर करण्यात आला.
– डॉ. निलेश कुरवाळे, कन्सल्टंट एपिलेप्सी सर्जन


आकडीच्या या रोजच्या त्रासातून मुक्त होऊन आनंदाने वैवाहिक जीवन जगण्यासाठी गीताला हा एक आशेचा किरण मिळाला. दुर्दैवाने, आजच्या काळातही आकडी येणे हा ग्रामीण भागात एक भयंकर प्रकार समजला जातो. गीताची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता तिच्यावर सर्व उपचार मोफत करण्यात आले.
– रेखा दुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आदित्य बिर्ला रूग्णालय

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.