पाकिस्तानात शिरकाव करण्याचा तरूणाचा बेत फसला

भुज: सोशल मीडियावर एका पाकिस्तानी तरूणीशी झालेल्या मैत्रीने महाराष्ट्रातील 20 वर्षीय तरूणाला गोत्यात आणले. मैत्रिणीला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानात शिरकाव करण्याचा बेत संबंधित तरूणाच्या अंगलट आला. त्याला गुजरातमध्ये कच्छच्या रणात भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी ताब्यात घेतले.
पाकिस्तानी तरूणीच्या भेटीसाठी लॉकडाऊनच्या काळातही मोठा आटापीटा करणाऱ्या तरूणाचे नाव झिशान मोहम्मद सिद्दीकी असे आहे. महाराष्ट्रातील उस्मानाबादचा रहिवासी असणारा झिशान इंजिनियरींगचा विद्यार्थी आहे. त्याची सोशल मीडियावरून पाकिस्तानच्या कराचीस्थित तरूणीशी काही महिन्यांपूर्वी ओळख झाली.
सातत्याने संपर्कात राहिल्याने त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यातून तरूणीला भेटण्यासाठी आतूर झालेल्या झिशानने थेट पाकिस्तान गाठण्याचे ठरवले. लॉकडाऊनमुळे वाहने उपलब्ध नसल्याने दुचाकीवरून प्रवास करण्याचे त्याने ठरवले. त्यासाठी त्याने 11 जुलैला उस्मानाबाद सोडले.
दुचाकीवरून प्रवास करून त्याने थेट गुजरातमधील कच्छचे रण गाठले. मात्र, वाळूतून पुढे जाता येत नसल्याने दुचाकी तिथेच सोडून तो पायी निघाला. महाराष्ट्रातील नोंदणी असणारी बेवारस दुचाकी गुरूवारी सायंकाळी आढळल्याने गुजरात पोलिसांनी अलर्ट जारी केला. त्यानंतर झिशानला पाकिस्तानात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असताना बीएसएफ जवानांनी ताब्यात घेतले. त्याला रोखण्यात आले ते ठिकाण भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे.
झिशानला नंतर कच्छ पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले.
झिशान घरातून अचानकपणे गायब झाल्याने त्याच्या कुटूंबीयांनी उस्मानाबाद पोलिसांत तक्रार नोंदवली. उस्मानाबाद पोलिसांच्या सायबर शाखेने झिशानचा मोबाईल फोनवरून माग काढला. तो कच्छजवळ असल्याचे स्पष्ट झाल्याने उस्मानाबाद पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला.
बीएसएफलाही माहिती देण्यात आली. त्यामुळे झिशानपर्यंत पोहचणे शक्य झाल्याचे समजते. आता त्याला परत आणण्यासाठी उस्मानाबादचे पोलीस पथक कच्छला रवाना झाले असल्याचे समजते.





