बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच मृत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित कोर्टात आरोपपत्र दाखल केले. या आरोप पत्रातून संतोष देशमुख यांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या पाहून बीडमधील केज तालुक्यातील जाणेगाव येथील तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. अशोक हरिभाऊ शिंदे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचे फोटो आल्यानंतर केजमध्ये बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये अशोक शिंदे यांनी सहभाग नोंदवला होता. त्यानंतर घरी आल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
धनंजय देशमुखांनी केले सांत्वन
ही घटना समोर आल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे अशोक शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पोहचले. संतोष भैय्यांचे फोटो पाहिल्यावर अशोक शिंदे काल भावना विवश झाले. ते नैराश्यामध्ये आले. केजच्या बंदमध्ये ते सहभाग झाले होते. कोणीही असे टोकाचे पाऊल उचलून नये. ज्यांनी चुकीची घटना केली, त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सर्वांनी सोबत राहायचे आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.