मुंबई – मराठी सिनेसृष्टीत सध्या नवं नवीन प्रयोग होताहेत. चांगले कथानक त्यासोबतच व्हीएफएक्स सारख्या तंत्राच्या वापरामुळे प्रेक्षक देखील चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यात ‘हर हर महादेव, सरसेनापती हंबीरराव’ अशा ऐतिहासिक चित्रपटांनी दमदार यश मिळवल्याने सध्या इंडस्ट्रीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती सुरु असल्याचे दिसून येते.
अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. आणि तो चित्रपट म्हणजेच, “वेडात मराठे वीर दौडले सात’ बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे.
हा चित्रपट मध्यंतरी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता या चित्रपटावर नवे संकट ओढवले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरात पन्हाळा परिसरात सुरू असताना एक तरुण कलाकार दरीत कोसळला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूरमधील पन्हाळगडावर चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना सज्जा कोठीवरून एक तरुण पाय घसरून दरीत पडला आहे.
शनिवारी 18 मार्च रोजी रात्री 9.15 च्या सुमारास ही घटना घडली. नागेश तरडे असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या नागेशची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या घटनेमुळे पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा मुंबईत एका इव्हेंटद्वारे करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. पृथ्वीराज हे ऐतिहासिक पात्र साकारल्यानंतर अक्षय कुमार आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.