येवल्यातील “तो’ तरुण शेतकरी नजरकैदेत

मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची कारवाई
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या नागरसूल येथील कृष्णा डोंगरे हा तरुण शेतकरी शेतमालाला भाव नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. सध्या त्याचे अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा असलयाने कृष्णा डोंगरेने कुठलीही गडबड करू नये म्हणून काल संध्याकाळपासून स्थानिक पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे.

मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत म्हणून मला त्यांच्या कुटुंबाने काढलेल्या अल्बमसाठी 500 रुपये द्यायचे होते. मात्र पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचे त्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तसेच पोलिसांकडून माझे आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही होत असल्याचा आरोप त्याने केला आहे.

दरम्यान, कृष्णा हा मोदी सरकारचा निषेध म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. कृष्णाने जमिनीच्या प्रश्नावरुन काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. परंतु सरकारने दडपशाही केल्याचा आरोप त्याने केला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात कृष्णाने आपले कपडे आणि चप्पल पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×