पोलीस पुरुष कर्मचाऱ्यांची वसुली आणि दुकानदारीला कंटाळून वरिष्ठ पातळीवर निर्णय
पुणे – वसुली आणि दुकानदारीच्या काही घटनांमुळे मागील काही दिवसांत चर्चेत असलेल्या येरवडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची धुरा आता महिला पोलीस अधिकारी आणी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता तरी येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी शिस्तीत काम करतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस ठाण्यात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या वसुली मामाचे “दुकान बंद’ झाल्यानंतरही तेथील इतर कर्मचाऱ्यांचे कारनामे बंद होत नव्हते. “पिटा’अंतर्गत एका कारवाईत एका कर्मचाऱ्याने हस्तक्षेप करत पोलीस दलाची प्रतिमा धुळीला मिळवली होती. याची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी चक्क महिला तपास पथक नेमण्याचा निर्णय घेतला. यामुळे लज्जेखातर का होईना, पण येथील वरिष्ठ व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील. हे पथक दि.4 फेब्रुवारीपासून पुढील आदेश होईपर्यंत महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार कार्यरत असणार आहे. या पथकात एक महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक महिलेसह पाच महिला शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांचे घनिष्ट संबंध
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, देशी दारुची विक्री आणि इतर अनैतिक धंद्यांचे पेव फुटले आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी येऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती. येथील तपास पथकातील कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचे अनैतिक धंदेवाल्यांशी घनिष्ट संबंध असल्याचे मागील काही घटनांवरुन उघडकीस आले आहे. यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या हाती तपास पथकाची धुरा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.