मार्केट यार्डात साठ रुपये प्रतिकिलो भाव; नाशिकच्या मालेगाव तालुक्यातून आवक
पुणे – मार्केट यार्डात पिवळा आणि जांभळ्या रंगाचा फ्लॉवर दाखल झाला आहे. या फ्लॉवरने किरकोळ व्यापाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे संचालक सचिन पायगुडे यांच्या गाळ्यावर शुक्रवारी 600 किलो पिवळा आणि जांभळ्या रंगाच्या फ्लॉवरची आवक झाली. 60 रुपये किलो भावाने त्याची विक्री झाली.
मालेगाव (जि. नाशिक) येथील दाभाडी गावातील शेतकरी महेंद्र निकम यांनी पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फ्लॉवरची लागवड केली आहे. हा फ्लॉवर बाजारात विक्रीस कसा पाठवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. बारामतीतील कृषी प्रदर्शनात त्यांनी हा फ्लॉवर मांडला होता. मात्र, त्याला बाजारपेठ मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी पणन संचालक सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला.
शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आडते सचिन पायगुडे आणि रोहन उरसळ नेहमी प्रयत्नशील असतात. निकम यांच्याशी संपर्क साधून फ्लॉवर मार्केट यार्डात विक्रीस पाठविण्यास सांगितले. किरकोळ व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी राहिली.
दररोज दोन टन उत्पादन
एका बहुराष्ट्रीय कृषी कंपनीने पिवळ्या आणि जांभळ्या फ्लॉवरचे वाण विकसित केले आहे. कंपनीकडून परदेशांत काही कृषीविषयक प्रकल्प करण्यात येत आहेत. त्या प्रतिनिधींबरोबर मी संपर्क साधला. भारतात पहिल्यांदाच पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या फ्लॉवरची लागवड केली. 30 गुंठे क्षेत्रावर फ्लॉवरची लागवड करण्यात आली आहे. दररोज दोन टन उत्पादन निघते. मुंबई, पुणे, नाशिक येथील बाजारात फ्लॉवर विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. पांढऱ्या फ्लॉवरच्या तुलनेत यामध्ये जीवनसत्त्व विपुल प्रमाणावर आहेत, असे महेंद्र निकम यांनी सांगितले.