“तानाजी’तील चुलत्याचे पात्र चुकीच्या पद्धतीचे

पात्र वगळण्याची नाभिक महामंडळ संघटनेची मागणी

नगर – अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान आणि अभिनेत्री काजोल यांची प्रमुख भूमिका असलेला “तानाजी’ या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सर्वच स्तरांतून या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे. या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलास वाघमारेच्या अभिनयाचे सुद्धा कौतुक होत असताना महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटनेने मात्र या पात्रावर आक्षेप घेतला आहे. चुलत्या हे पात्र चुकीच्या पद्धतीने चित्रपटात दाखवले असल्याने ते वगळण्यात यावे अशी मागणी या संघटनेने केली आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नगर जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन “तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील चुलत्या हे पात्र वगळण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या निवेदनात ते म्हणाले की, तानाजी चित्रपट खरोखरच चांगला चित्रपट आहे. स्वराज्यासाठी अठरा पगड जातीत ज्या मावळ्यांनी बलिदान दिले त्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. नाभिक समाजातील शूरवीर जीवा महाले, शिवा काशीद अशा अनेक शूरवीरांनी बलिदान दिले. तानाजी चित्रपटातील कोणत्याही पात्रांवर आमचा आक्षेप नाही. परंतु, चुलत्या हे पात्र चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. या पात्रामुळे नाभिक समाजात असंतोष पसरला आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटातील चुलत्या पात्र वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी टॅक्‍स फ्री देखील केले आहे. महाराष्ट्राच्या गोडोली गावातले लोक मात्र या सिनेमाच्या निर्मात्यांवर नाराज आहेत. गोडोली हे तान्हाजी मालुसरे यांचे जन्मगाव. मात्र या गावाचा सिनेमात उल्लेखच केला नसल्याने गावकरी नाराज झाल्याची बातमी पसरली आहे. या बातमीनंतर आता चुलत्या या पात्रावर नाभिक समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे पात्र चित्रपटातून वगळण्यात यावे अशी मागणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.