घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात; राजू शेट्टी उद्विग्न

नात्यात अंतर पडत असल्यास विधानपरिषदेची ब्याद नकोच

सांगली: महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्‌टी यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्‍चित करण्यात आल्यानंतर काही नेत्यांमधील नाराजी समोर आली आहे. वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव विधानपरिषदेसाठी निश्‍चित झाल्यावर जालंदर पाटील आणि सावकार मदनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. यावर राजू शेट्टी म्हणाले, राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता.

राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्वीकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो, असा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. महावीर अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले.

जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. 12 जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकार मदनाईक, पक्षाचे अध्यक्ष जालंदर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एकमताने आघाडीचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरले, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.