टोकियो – जागतिक जलतरण स्पर्धा देखील करोनाच्या संकटामुळे लांबणीवर टाकण्यात आली होती. ही स्पर्धा आता 2022 साली जपानमध्येच होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने जाहीर केले आहे.
मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा पुढील वर्षी होणार होती. मात्र, करोनाच्या धोक्यामुळे जपानमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आल्याने त्याचा फटका जलतरण स्पर्धेला बसला आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी ज्या तारखांना होणार होती, त्यातच ऑलिम्पिकचे वेळापत्रक येत असल्याने महासंघाने 2022 साली स्पर्धा घेण्याचे निश्चित केले आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा फुकुओका येथे 13 ते 29 मे 2022 या कालावधीत होणार आहे.