वॉशिंग्टन – जागतिक आरोग्य संघटनेची विश्वासर्हता संपली आहे. ही संघटना चीनच्या तालावर नाचणारी संघटना बनली असून ती चीनची पूर्ण बटिक बनली आहे, असा आरोप अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने केला आहे. या संघटनेचा निधीही अमेरिकेने नुकताच रोखला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रिएन यांनी म्हटले आहे की, आता त्यांच्यात विश्वासर्हताच उरलेली नाही ही त्यांची मुख्य समस्या आहे. अर्थात आत्तापर्यंत ही फार विश्वासार्ह संस्था होती असेही नव्हे असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, अमेरिका या संघटनेवर अर्धा अब्ज डॉलसचा खर्च करीत होती. तर चीनकडून या संघटनेला केवळ चाळीस दशलक्ष डॉलर्सची मदत मिळत होती.
चीनची ही मदत अमेरिकेच्या एकदशांश इतकीही नाही पण तरीही ही संघटना चीनच्याच तालावर नाचत राहिली. या संघटनेने 14 जानेवारी रोजी अमेरिकेला सांगितले होते की, करोना हा माणसाला माणसापासून संक्रमित होणारा रोग नाही. जेव्हा चीन मध्ये प्रत्यक्ष माणसाला माणसापासूनच करोना संक्रमित होण्याचा प्रकार सुरू होता त्याचवेळी हे मात्र आम्हाला तसे काही नाही असे सांगत राहिले होते त्यातच त्यांच्या दाव्यातील खोटेपणा उघड झाला, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आणखी एका बाबीकडे लक्ष वेधताना म्हटले आहे की, 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने करोना रोखण्यासाठी अत्यंत उत्तम उपाय करून त्याचे संक्रमण रोखले आहे. पण प्रत्यक्षात आज जगातील 184 देशांमध्ये हा रोग पसरला आहे. यातूनही त्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. या साऱ्या प्रकारामुळे त्यांची विश्वासार्हताच संपुष्ठात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला मदत करून आम्ही आमच्या करदात्यांनी दिलेला पैसा वाया घालवण्यापेक्षा आम्ही जगभरातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या रेडक्रॉस सारख्या संघटनांना हा पैसा थेट स्वरूपात देऊ असेही त्यांनी म्हटले आहे.