आजपासुन विश्‍वचषक स्पर्धेचे बिगुल वाजणार

पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका दरम्यान रंगणार

लंडन: क्रीडाविश्वातील सर्वाधिक महत्त्वाची असणारी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा 30 मे ते 14 जुलै 2019 दरम्यान इंग्लंड व वेल्समध्ये रंगणार असून यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा विश्‍वचषक आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी 1975, 1979, 1983 आणि 1999 साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. यंदाचा पहिला सामना यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान लंडन येथील प्रसिद्ध ओव्हल मैदानावर होणार आहे. तर, अंतिम सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर दिनांक 14 जुलै रोजी होईल.

1992 नंतर प्रथमच विश्‍वचषक स्पर्धेत केवळ 10 संघ सहभागी झालेले असुन यंदाची स्पर्धाही राऊंड रॉबीन पद्धतीने होणार असुन त्यानंतर पुढील सामने हे बाद फेरी पद्धतीने होतील. यंदाच्या स्पर्धेत प्रत्येक संघाला साखळी फेरीत 9 सामने खेळावे लागणार असुन यंदा प्रत्येक सहभागी संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळणार असल्याने स्पर्धेचा रोमांच आणखीनच वाढलेला असुन यंदा एक किंवा दोन संघ विजेतेपदाचे दावेदार नसुन सहा ते सात संघ विजेतेपदाचे दावेदार असणार आहेत त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत विजेतेपदासाठी चुरस पहायला मिळणार हे नक्‍की आहे.

यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून एकूण 100 करोड रुपयांचा म्हणजेच 14 मिलियन यूएस डॉलरचा वर्षाव होणार असुन त्यामुळे ही स्पर्धा आता पर्यंतची सर्वात व्यवस्थापन आणि आर्थिकदृष्ट्‌या मोठी स्पर्धा ठरणार आहे. बक्षीस म्हणून मिळणाऱ्या पैशांमध्ये विजेता संघ तब्बल 32 करोड रुपयांचा म्हणजेच 4.8 मिलियन डॉलरचा धनी होणार आहे. ही रक्‍कम 1975 साली झालेल्या पहिल्या विश्‍वचषकादरम्यान एकूण बक्षीस रक्कम एक लाख पौंड म्हणजेच आजच्या चलनात सुमारे 1 करोड रुपयेच्या शंभर पट अधीक आहे. त्यावेळी विश्‍वविजेता ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाला 4 हजार पौंड म्हणजेच सुमारे 4 लाख रुपये इतकी रक्कम मिळाली होती. तेव्हा आणि आत्ताच्या काळातील आर्थिक फरक पाहिल्यास यंदाची स्पर्धा ही आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धा ठरु शकते.

त्याच बरोबर तब्बल 20 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये विश्‍वचषक स्पर्धा आयोजीत केली गेली असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारलेला दिसुन येत आहे. त्यात महिला चाहत्याही मागे नसल्याचे आयसीसीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघड झाले आहे. इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणाऱ्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेला महिलांनीही पसंती दर्शवली असून तब्बल एक लाखांपेक्षा अधिक महिला चाहत्यांनी विश्‍वचषकाची तिकिटे खरेदी केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केला आहे. क्रिकेटच्या या कुंभमेळ्यासाठी दोन लाखांहून अधिक लोक क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी येणार असून त्यात एक लाखांपेक्षा जास्त महिलांचा सहभाग असेल, असा दावा स्पर्धेचे संचालक स्टीव्ह एलवर्थी यांनी केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, यंदाच्या विश्‍वचषकात 1 लाख 10 हजार महिलांनी सामन्यांची तिकिटे विकत घेतली आहेत. त्याचबरोबर एक लाखांपेक्षा जास्त 16 वर्षांखालील चाहते विश्‍वचषकाचा आनंद लुटतील. त्यामुळे युवा चाहते क्रिकेटकडे जास्त आकर्षित होतील, अशी संयोजक समितीला आशा आहे. यंदा प्रथमच दोन लाखांपेक्षा अधिक चाहते क्रिकेटचा हा महासंग्राम पाहण्यासाठी मैदानात अवतरतील. त्याचबरोबर युवा चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना राबविल्या होत्या. त्या यशस्वी झाल्या आहेत, असे एलवर्थी म्हणाले. 20 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये प्रथमच होणाऱ्या आयसीसी विश्वचषकाच्या 12व्या पर्वाची माहिती देण्यासाठी एलवर्थी, आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन तसेच स्पर्धेचे सुरक्षाविषयक संचालक जिल मॅकक्रॅकेन यांनी पत्रकार परिषद आयोजीत केली होती.

आतापर्यंतचे विश्‍वचषक विजेते संघ आणि कर्णधार

वर्ष संघ कर्णधार
1975 वेस्ट इंडिज क्‍लाईव्ह लॉईड
1979 वेस्ट इंडिज क्‍लाईव्ह लॉईड
1983 भारत कपिल देव
1987 ऑस्ट्रेलिया ऍलन बॉर्डर
1992 पाकिस्तान इम्रान खान
1996 श्रीलंका अर्जुन रणतुंगा
1999 ऑस्ट्रेलिया स्टिव्ह वॉ
2003 ऑस्ट्रेलिया रिकी पॉन्टिंग
2007 ऑस्ट्रेलिया रिकी पॉन्टिंग
2011 भारत महेंद्रसिंग धोनी
2015 ऑस्ट्रेलिया मायकल क्‍लार्क

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here