सिंगापूर – हा क्षण मी लाखो वेळा जगलो आहे. दररोज सकाळी मी उठतो, तेव्हा हाच क्षण मला जाग येण्याचे कारण होते, ही ट्रॉफी वास्तव आहे, माझ्या आयुष्यातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या गोष्टीचे माझ्यासाठी महत्व जास्त आहे, अशी भावना भारताचा दुसरा जगज्जेता डी. गुकेशने जगज्जेतेपदाचा करंडक स्वीकारताना व्यक्त केली.
भारताच्या डी. गुकेशने गुरुवारी चीनच्या डिंग लिरेनला नमवून विश्वनाथन आनंद नंतर दुसरा जगज्जेता होण्याचा मान मिळविला. तो आतापर्यंतचा सर्वात तरुण जगज्जेता बनला आहे. गुकेशपूर्वी रशियाचा गॅरी कास्पारोव्ह सर्वात तरुण जगज्जेता होता. मात्र गुकेशने केवळ १८ व्या वर्षीच हा मान मिळविला.
गुकेश म्हणाला, हा प्रवास काही स्वप्नांपेक्षा कमी नव्हता. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, नवी आव्हाने उभी राहात होती. या प्रवासामध्ये घडलेली एकही गोष्ट मी बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. हा प्रवास केवळ माझ्यासोबत असणाऱ्या लोकांमुळे सुकर झाल्याने गुकेशने बोलताना सांगितले. गुकेश हा या स्पर्धेत आव्हानवीर म्हणून सहभागी झाला होता. त्याने प्रतिस्पर्धी, याचबरोबरीने त्याच्या सोबत असातत्याने उपस्थित राहिल्याबददल त्याचे पालक, त्याच्या बरोबर असणार संघ, यजमान देश, गेल्या तीन आठवड्यांच्या काळात मिळालेले नवीन चाहते आणि ईश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
तामिळनाडू सरकारकडून पाच कोटींचे बक्षीस
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून तामिळनाडू सरकारच्या वतीने गुकेशला ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विजेत्या गुकेशला त्याच्या अतुलनीय कामगिरीसाठी ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करताना आनंद होत आहे. त्याच्या ऐतिहासिक विजयाने देशाला मोठा अभिमान आणि आनंद दिला असून त्याने भविष्यात देखील अशीच चमकदार कामगिरी करताना यशाची उंच शिखरे गाठावीत असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट संघाकडून अभिनंदन
ब्रिस्बेन कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संघाच्या वतीने डी. गुकेशचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल म्हणाला की, गुकेशने केलेल्या कामगिरीचा प्रत्येकाला अभिमान असून संपूर्ण भारतीय संघाकडून मी गुकेशचे अभिनंदन करतो. गुकेशने सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला असल्याने, हा एक विक्रमच असल्याचे गिल म्हणाला.