पूर पंचनाम्यांची कामे कासवगतीने

ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे परिणाम : पुणे जिल्ह्यातील स्थिती

पुणे – विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेले असून तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे पुणे विभागातील पुरातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. पंचनामे करण्याकरिता कृषी सहाय्यकांची मदत घेतली जात असली तरी देखील ही संख्या अपुरी असल्याने अपेक्षित वेगाने पंचनाम्यांचे काम होत नसल्याची जिल्ह्यातील स्थिती आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेला आता एक महिना उलटला आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन त्याचा अहवाल तातडीने सदर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, ग्रामसेवकांनी पुकारलेला संप आणि पावसामुळे गाव तलाठ्यांची कार्यालयातील उपस्थिती तुलनेत कमी असल्याने ही जबाबदारी कृषी सहाय्यकांवर आली आहे. मात्र, जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांची संख्या लक्षात घेता या कामाला बराच अवधी लागत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्यापही पंचनामे करण्यास सुरुवात झालेली नाही. पंचनामे सुरू झालेले काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे हे पंचनामे वेळेत होऊन नुकसान भरपाई मिळेल की नाही, याबाबत बाधित शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, ग्रामसेवकांच्या संपाबाबत राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यामुळे संप मागे घेण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे पंचानामे करण्याचे काम वेगाने सुरू होईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

27 हजार 618 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे भात खाचारांत पाणी साचल्याने अनेक ठिकाणी भाताचे बांध फुटून मोठे नुकसान झाले. पूर्वेकडील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढल्याने अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे बटाटा, मूग, वाटाणा, उडीद व सोयबीन या पिकांचे मोठे नुकसान जाले आहे. जिल्ह्यात कोरडवाहू आणि बागायती असे एकूण दोन लाख 93 हजार 216 हेक्‍टर क्षेत्र आहे. पावसामुळे सुमारे 27 हजार 618 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातील माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.