विद्यापीठाचे काम ठप्प होण्याची शक्‍यता

निवडणूक कामामुळे अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणासाठी

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्‍त केले आहे. विद्यापीठातील बहुतांश कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी विद्यापीठाबाहेर जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख व्यक्‍तींना या कामातून सवलत मिळावी, असे पत्र विद्यापीठाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

लोकशाही भक्कम करण्यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी निवडणुकांच्या कामात आपला सहभाग नोंदविला पाहिजे. ही बाब खरी असली, तरी विद्यापीठासारखी संस्था चालविण्यासाठी काही कर्मचारी विद्यापीठात असणे आवश्‍यक आहे. अन्यथा विद्यापीठ सुरू ठेवणे शक्‍य नाही.

आरोग्य विभाग, पाणी पुरवठा करण्यासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना या कामातून वगळावे, असा पत्रव्यवहार विद्यापीठाने केला. मात्र, त्यातील अत्यावशक सेवा देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.विद्यापीठातर्फे तीन जिल्ह्यींतील संलग्न महाविद्यालयांची परीक्षा घेतली जाते. मात्र, प्राध्यापक अनेक विभागाचे प्रमुख, उपकुलसचिव, कक्ष अधिकारी यांनाही निवडणुकीच्या कामास नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी अर्धा दिवस विद्यापीठाबाहेर जावे लागते. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणानंतर विद्यापीठात पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे विद्यापीठाचे काम ठप्प होते. शैक्षणिक कामात अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांना या कामातून वगळावे, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.