पुणे मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचे कामही रुळावर

टाटा-गुलेरमार्क कंपनीची निविदा मंजूर

पुणे – मेट्रोच्या बुधवार पेठ ते स्वारगेट या 4.74 किलो मीटरच्या भुयारी मार्गाच्या कामाच्या निविदेस महामेट्रोने अखेर मंजूरी दिली आहे. या कामासाठी सुमारे 1,160 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च येणार असून हे काम टाटा-गुलेरमार्क या कंपनीस देण्यात आल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रो कॉरिडॉरमध्ये एकूण 16.58 किमी पैकी 5.1 किमीचा मार्ग भुयारी आहे. हा मार्ग कृषी महाविद्यालय येथून सुरू होत असून स्वारगेटपर्यंत जमिनीखालून जातो. या मार्गात प्रथम स्थानक शिवाजीनगर बसस्टॅन्ड नंतर सिव्हील कोर्ट, फडके हौद, मंडई व स्वारगेट अशी स्थानके आहेत. यामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी कामाची विभागणी दोन भागांत करण्यात आली होती व त्यासाठी स्वतंत्र दोन निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात पहिल्या विभागासाठी रेंजहिल्स ते बुधवार पेठ ते फडके हौद असा असून त्याचे कॉन्ट्रॅक्‍ट डिसेंबर-2018 रोजी देण्यात आले होते. दुसरा भाग फडके हौद ते स्वारगेट असून त्याची निविदा 18 फेब्रुवारीला टाटा-गुलेरमार्क या कंपनीस देण्यात आली आहे. दरम्यान, हे काम सुरू करण्यासाठी महापालिकेकडून या पूर्वीच शाफ्ट तयार करण्याचे काम रेंजहिल्स आणि स्वारगेट येथे सुरू करण्यात आले आहे.

…असे असेल काम
– बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट येथे भुयारी स्थानके यांचे बांधकाम व स्थानकांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे बांधकाम.
– 4.74 किमी असून त्यात 2.37 किमी लांबीचे दोन टनेल बांधण्यात येणार आहेत
– 1160.23 कोटींचा खर्च.
– कामासाठी 2 टनेल बोअरिंग मशीन वापरणार
– 2 वर्षांत पूर्ण केले जाणार काम.
– या कामाला दोन वर्ष इतका कालावधी लागणार आहे. या भुयारी मार्गाचे काम जलद होण्यासाठी पुणे मेट्रोने आधीच स्वारगेट येथे शाफ्टचे काम सुरू केले आहे.
– या टनेलचा व्यास 6.35 मी असून टनेलचे सर्व बाजुंनी कॉंक्रिट रिंगद्वारे आच्छादित केल्यानंरचा व्यास 5.8 मी इतका असणार आहे. यामुळे टनेल एखाद्या ट्युब सारखे तयार होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.