पिंपरी – नेहरुनगर येथे महापालिकेच्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणाऱ्या न्यायालयातील कोर्ट हॉल, स्वच्छतागृह, वकीलांना बसण्यासाठी खोली, मुद्देमाल खोली, रेकॉर्ड खोली आदींचे कामे अद्याप अपूर्ण आहेत. आयुक्त राजेश पाटील यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला 15 तारखेपर्यंत “डेडलाइन’ दिलेली होती. मात्र अनेक कामे अपुर्णावस्थेत असल्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नेहरुनगर येथे न्यायालयाच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी शुक्रवारी (दि. 13) मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश आर.आर. काळे, न्यायाधीश पी. सी. फटाले, एन. टी. भोसले तसेच पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. गौरव वाळुंज यांनी केली. यावेळी ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सचिन थोपटे यांनी न्यायाधीशांसमवेत या कामकाजाबाबत मोरवाडी येथील न्यायालयात चर्चा केली. नेहरूनगर येथील महापालिकेच्या इमारतीत मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय स्थलांतरित केले जाणार आहे.
हे काम 15 तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले होते. मात्र, सध्या येथील विविध कामे अपूर्ण असल्याची बाब या पाहणीत समोर आली आहे. इमारतीत एकूण 11 कोर्ट हॉलचे काम करण्यात येत आहे. त्यातील 7 कोर्ट हॉलचे काम अंतिम टप्प्यात आहे. तथापि, या कोर्ट हॉलमध्येही स्वच्छतागृहांतील अनेक कामे बाकी आहेत. वकीलांना बसण्यासाठी खोली, मुद्देमाल रूम, रेकॉर्ड रूम आदींची कामे प्रलंबित आहेत. त्याशिवाय, कॉम्प्युटर विभागाचे काम अपुर्णावस्थेत आहे.
ही कामे पूर्ण करण्याबाबत कंत्राटदाराला आयुक्तांनी आढावा बैठक घेऊन समज दिली होती. त्यानंतरही ही कामे अपुर्णच असल्याने न्यायाधीशांनी आज केलेल्या पाहणीदरम्यान राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी गरज पडल्यास मनुष्यबळ वाढवा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.