वाघोली – गोरगरिबांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या तेजस्विनी सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते रामभाऊ दाभाडे यांनी केले.
तेजस्विनी सामाजिक संस्था ग्रुप अंतर्गत अथर्व मल्टी स्पेशलिस्ट क्लिनिक यांच्या वतीने वाघोली येथे मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते रामभाऊ दाभाडे बोलत होते.
संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादीचे नेते रामदास भाऊ दाभाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय कटके, सामाजिक कार्यकर्ते अंबादास साळुंखे, माजी ग्रामपंचायत सदस्य सोपान गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात महिलांचे हाय जिन बाबतचे प्रश्न त्यावरील घरगुती उपाय तसेच लहान मुलांचे संगोपन, याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
मोफत औषध उपचाराचा लाभ जवळपास दोनशे नागरिकांनी घेतला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार यांनी दिली. महिला सबलीकरण तसेच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या कार्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कटके यांनी देखील कौतुक केले.