संगमनेर, (प्रतिनिधी) – बावनकुळे यांच्या भूखंडाला परवानगी दिली की नाही हे मला आज तरी माहिती नाही परंतु या तीन महिन्यांमध्ये जे काही महायुती सरकारचं चाललं आहे ते अत्यंत चुकीचे चालू आहे. भूखंडाच्या बाबतीत विल्हेवाट लावण्याचा प्रकार चालू आहे.
स्वस्तामध्ये जमिनी धनदांडग्याना देण्याचा प्रकार चालू आहे. त्यातून पैशांचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. राज्यांमध्ये धनदांडग्यांना जमिनीचे वाटप सुरू आहे.
या अत्यंत चुकीच्या गोष्टी सुरू आहेत आणि या गोष्टी थांबल्या पाहिजेत. हजारो कोटी रुपयांची जमीन कवडीमोल भावात धन दांडग्यांच्या घशात घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केला आहे. हा प्रकार लवकरात लवकर थांबला पाहिजे, अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
थोरात म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीचा विल्हेवाट लावण्याचे काम राज्यात चालू आहे. याशिवाय दुग्धविकास विभागाची वरळी येथील ज जमिनीची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू आहे, याबाबत बैठकाही सुरू आहेत.
तसेच पुणे, कुर्ला आणि चाळीसगाव येथील जमिनीचेही विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातून पैसा काढायचा प्रकार सुरू आहे.
हे थांबलं गेलं पाहिजे तसेही पुढे आमचे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, त्यामुळे या गोष्टी थांबणारच असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्रात दौरे सुरू आहेत, यावर बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सामान्य नागरिक हे महाविकास आघाडी बरोबर आहेत.
त्यामुळे कोणीही दौरे केले तरी त्यांना आढावा बैठकीत कळेल की सामान्य नागरिक कोणासोबत आहेत आणि पुढील सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार आहे.
पिचड पिता-पुत्र यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने ते तुतारी हातात घेणार यावर बोलताना थोरात म्हणाले की, महाविकास आघाडीची ताकद ही वाढलेलीच आहे.
सामान्य नागरिकांनी महाविकास आघाडीची ताकद वाढवलेली आहे. संपूर्ण राज्यातून सोडून गेलेले लोक महाविकास आघाडीकडे येऊ इच्छितात. त्यामुळे पुढील सरकार महाविकास आघाडीचे असणार असल्याचा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.