तारकपूर रस्त्यावरील खड्ड्यांच्या पॅचिंगचे काम सरू

पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप टाकणार
फिनिक्‍स फाउंडेशनच्या आंदोलनाला यश
नगर (प्रतिनिधी) –
लाखो रुपये खर्च करुन पंधरा दिवसापूर्वी झालेल्या डिएसपी चौक ते तारकपूर रस्त्यावरील खड्ड्यात रोप लावून व हार घालून निषेध नोंदविणाऱ्या फिनिक्‍स सोशल फाउडेशनच्या आंदोलनाची दखल घेत शुक्रवार (दि.5) पासून खड्डे बुजविण्याचे काम जागतिक बॅंक प्रकल्पाच्या वतीने हाती घेण्यात आले. तर शनिवारी या रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.

तारकपूर बस स्थानक समोर मोठे खड्डे पडले असून, हे खड्डे लहान-मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरत होते. झालेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध नोंदवत फिनिक्‍स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कार्यवाही सात दिवसात न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

या कामाची पहाणी जागतिक बॅंक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एन.एन. राजगुरु, शाखा अभियंता अभय भांगे, उपअभियंता संजय गायकवाड व फिनिक्‍सचे जालिंदर बोरुडे उपस्थित होते. गटार तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. करोनामुळे रस्त्यालगत असलेल्या गटारीचे काम रखडले गेले. नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करुन, रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवण्यात आले आहे. व पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे काम देखील पूर्ण केले जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता अभय भांगे व उपअभियंता संजय गायकवाड यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.