अडीच महिन्यांत वीस टक्के काम पूर्ण ः सपाटीकरण, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू
पार्किंगची पुरेशी व्यवस्था
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मोशी येथे पहिल्या टप्प्यात साकारणाऱ्या खुल्या प्रदर्शन केंद्राच्या कामाला वेग आला आहे. संबंधित केंद्राच्या जागेत सपाटीकरण, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते यांची कामे सुरू आहेत. काम सुरू झाल्यापासून गेल्या अडीच महिन्यांत 20 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मोशी येथील 240 एकर जागेत पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र साकारत आहे. या कामातंर्गत पहिल्या टप्प्यात खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. 21 फेब्रुवारीला या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली. खुल्या प्रदर्शन केंद्राच्या 20 हेक्टर जागेचे सपाटीकरण, एकूण 3.75 किलोमीटर अंतराचे अंतर्गत रस्ते, मुख्य प्रवेशद्वार, पाण्याची टाकी (3 लाख लिटर), स्वच्छतागृह, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग, लॅण्डस्केपिंग, विद्युतीकरण आदी कामे नियोजित आहेत. काम पूर्ण करण्यासाठी 15 महिन्यांची मुदत दिलेली आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी 44 कोटी 22 लाख इतका खर्च येणार आहे.
प्रकल्पामुळे होणारा फायदा उद्योगांच्या उत्पादित मालाच्या मार्केटिंगसाठी बाजारपेठ उपलब्ध होणार मोशी परिसरातील विविध उद्योग-व्यवसायांच्या प्रगतीसाठी प्रकल्प ठरणार पूरक प्रकल्प सुरू झाल्यानंतर मोशी परिसराची निर्माण होणार वेगळी ओळख खुल्या प्रदर्शन केंद्राला भेट देणाऱ्या नागरिकांची पार्किंगची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने येथे पुरेशी सोय करण्यात येणार आहे. पार्किंगसाठी 44 हजार 607 चौरस मीटर इतके क्षेत्र निश्चित केले आहे. संबंधित जागेत एकावेळी 1 हजार 22 चारचाकी तर, 3 हजार 816 दुचाकी वाहने लावता येणार आहेत.
“”मोशी येथील खुल्या प्रदर्शन केंद्राच्या कामासाठी 15 महिन्यांची मुदत दिलेली आहे. तथापि, मुदत पुर्ण होण्याच्या आधी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.”
– प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण