हर्षवर्धन पाटील यांचे सूचक वक्तव्य
रेडा – इंदापूर तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभेला आघाडी धर्माचे पालन केले आहे. त्यावेळी लोकसभेला त्यांचे काम करायचे व विधानसभेला राष्ट्रवादीने आपले काम करायचे, असे स्पष्ट बोलणे झाले होते.
तरी राष्ट्रवादी दिलेला शब्द पाळत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील जनता जो निर्णय घेईल तीच माझ्या राजकारणाची पुढची दिशा असेल, असे स्पष्ट संकेत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले. दरम्यान, पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी सूचक वक्तव्य करून मौन सोडले आहे. बिजवडी (ता. इंदापूर) येथे गावभेट दौऱ्यात ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, आघाडीचा धर्म राष्ट्रवादीने पाळला पाहिजे. लोकसभेला राष्ट्रवादीचे कॉंग्रेसने काम करायचे ठरले होते. आम्ही केले आहे. मात्र, विधानसभेला राष्ट्रवादीने कॉंग्रेसचे काम करायचे आहे, असे ठरले होते. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा इंदापूरला आणली कशासाठी. त्यांना इंदापुरात यायचे होते तर त्यांनी आम्हाला सांगितले नाही, असाही संताप त्यांनी व्यक्त केला. पाटील यांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.