गोलार्धातील चमत्कार

खूपदा आपण गमतीशीर छायाचित्रं पाहतो. कुणी मावळता सूर्य बोटावर तोलून धरलाय तर कुणी ओंजळीत चंद्र पकडलाय अशी छायाचित्रं अनेकांनी पाहिलेली असतील. मीही असे काही फोटो माझ्या पर्यटनात काढले. पिसाच्या झुकत्या मनोऱ्याला टेकू देतोय असा फोटो इटलीत काढला. इंग्लंडमधल्या जगप्रसिद्ध ग्रीनिच वेधशाळेला 2002 मध्ये भेट दिली. मूळ शून्य रेखांश रेषा तिथून जाते. ती रेषा तिथं आखलेलीही आहे. त्या रेषेवरून दोन्ही पाय टाकून-म्हणजे एक पाय पृथ्वीच्या पश्‍चिम गोलार्धात तर दुसरा पूर्व गोलार्धात-अशा पद्धतीनं छायाचित्र काढून घेण्याचा मोह मलाही आवरला नाही. अर्थात शून्य रेखांश ही पूर्णत: काल्पनिक संदर्भरेषा आहे हे ठाऊक असल्यानं या प्रकारात खास वैशिष्ट्य नाही हे जाणवत होतं.

मात्र आफ्रिकेच्या प्रवासात खरंखुरं भौगोलिक वैशिष्ट्य पाहावयास मिळालं. ग्रेट रिफ्ट व्हॅली (दीर्घानुपाट दरी) आणि नाकुरु सरोवर यामधील रस्त्यावर गाडी थांबली. ड्रायव्हरनं आपण थेट विषुववृत्तावर आलो आहोत असं जाहीर केलं. जवळच एका मोकळ्या जागेवर एक फलक लावला होता-येथून विषुववृत्त जाते. अर्थातच दोन्ही पायांमधून विषुववृत्ताची रेषा जाईल अशा पद्धतीनं आम्ही फोटो काढून घेतले. विषुववृत्त ही रेषाही काल्पनिक आहे; परंतु विषुववृत्त ही कल्पना मात्र भौगोलिकदृष्ट्या ग्रीनिचच्या 0 अंश रेखांश रेषेप्रमाणे काल्पनिक नाही. पृथ्वीच्या पोटाचा घेरच म्हणाना. पृथ्वीच्या ध्रुवांपासून अक्षांशाच्या गोल रेषा काढीत गेल्यास सर्वात मोठ्या परिघाची रेषा म्हणजे विषुववृत्त.

थोडक्‍यात भूमातेच्या पोटावर चक्‍क पाय देऊन आम्ही उभे होतो! तसंही म्हटलं तर आपण सगळे मानव निसर्गाचा विध्वंस करीत तिच्या पोटावर पायच आणत नाही का? पण ते जाऊ दे कारण तो या लेखाचा विषय नाही.
पृथ्वीच्या मध्यभागावरून जाणारं विषुववृत्त पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन भाग करतं. पृथ्वीचा आस कललेला असल्यानं सूर्यप्रकाश विषुववृत्ताकडून कर्कवृत्ताकडे जातो. तिथून तो पुन्हा विषुववृत्ताकडे येतो आणि पुढं मकरवृत्तापर्यंत जातो आणि मकरवृत्ताकडून पुन्हा विषुववृत्ताकडे येतो. या सगळ्या चक्राची पुनरावृत्ती कोट्यवधी वर्षं अव्याहतपणे चालू आहे. या चक्रामुळेच पृथ्वीवर ऋतू होतात हे सगळं आपण शिकलो आहे. आमच्या विषुववृत्ताच्या भेटीमध्ये एक कृष्णवर्णीय गृहस्थ तिथं आला. त्याच्या हातात एक प्लॅस्टिकचा जार आणि त्यावर एक तसाच प्लॅस्टिकचा बाऊल होता. मोडक्‍या तोडक्‍या इंग्रजीमध्ये त्यानं सांगितलं की विषुववृत्ताजवळ होणारा एक शास्त्रीय परिणाम प्रयोगाद्वारे तो दाखवू इच्छितो. आम्हाला आश्‍चर्य वाटलं. मीही याबाबत काही वाचलेलं नव्हतं. बऱ्याच जणांना हा काहीतरी भोंदूगिरीचा प्रकार असावा असं वाटलं. पण तो कृष्णवर्णीय गृहस्थ पैसेही मागत नव्हता. मला तो सांगत असलेल्या प्रकाराबद्दल कुतूहल वाटलं.

त्यानं विषुववृत्ताच्या रेषेच्या काहीसं दूर-म्हणजे भौगोलिकदृष्ट्या उत्तर गोलार्धात-जमिनीवर प्लॅस्टिक जार ठेवलं. जारवर त्यानं प्लॅस्टिक बाऊल ठेवलं. बाऊलच्या तळाला एक बारीक छिद्र होतं. त्यानं बाऊलच्या काठापासून खाली बोटभर उंचीपर्यंत पाणी भरलं. तळाच्या बारीक छिद्रामधून हळूहळू पाणी जारमध्ये पडू लागलं. पण यामुळं एक छोटासा भोवरा वरच्या बाऊलमध्ये निर्माण झाला. आता त्या गृहस्थानं काड्यापेटीतील एक काडी हलकेच बाऊलमधल्या पाण्यात टाकली. एका विशिष्ट दिशेनं ती काडी त्या बाऊलमध्ये वर्तुळाकार पद्धतीनं फिरू लागली. ज्या दिशेनं ती काडी फिरत होती त्याची त्या गृहस्थानं आम्हाला नोंद करून ठेवायला सांगितली.

आमच्यातील काही हौशी पर्यटकांनी या प्रयोगाचं चलचित्रीकरणही केलं. नंतर त्यानं आपलं उपकरण विषुववृत्ताच्या विरुद्ध दिशेला-म्हणजे आता दक्षिण गोलार्धात आणलं. तिथं त्यानं तोच प्रयोग रिपीट केला. आणि काय चमत्कार-आता ती काडी बरोबर उलट्या दिशेला फिरू लागली. आम्ही अक्षरश: तोंडात बोटं घातली, पण तो माणूस एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं याच प्रयोगाची पुनरावृत्ती थेट विषुववृत्ताच्या रेषेवर केली आणि आता मात्र ती काडी छिद्राच्या बरोबर वर चक्राकार फिरू लागली. आमच्यातील काही लोकांना यात काहीतरी बनवाबनवीचा संशय आला. मला मात्र प्रयोगात काहीतरी शास्त्रीय तत्त्व असलं पाहिजे असं वाटत होतं.

सगळ्या प्रकरणाचा उलगडा मी पुन्हा भारतात आल्यानंतर झाला. अभ्यासानंतर असं लक्षात आलं की भौतिकविज्ञानात या परिणामाला कोरिऑलिस परिणाम अशी संज्ञा आहे. पृथ्वीच्या गतीची प्रतिक्रिया म्हणून असा परिणाम होतो.
आता एक वेगळाच प्रश्‍न माझ्यासमोर ठाकला. टॉयलेट बाऊलमध्ये आणि सिंकमध्ये पाण्याचा जो भोवरा तयार होतो त्याची दिशा मात्र उत्तर आणि दक्षिण गोलार्धात अजिबात बदलत नाही. मग कोरिऑलिस परिणामाचं काय होतं? याचा उलगडा असा आहे की हा परिणाम अगदी सूक्ष्म असल्यानं उच्च वेगानं पाणी वाहत असताना तो जाणवण्याइतपत नसतो. विषुववृत्ताजवळील प्रयोगात बाऊलमधील छिद्र खूप छोटं ठेवून अगदी लहान प्रमाणात भोवरा तयार करण्यात येतो आणि तेव्हाच हा परिणाम दृश्‍य स्वरूपात प्रकट होतो. विषुववृत्त ही शून्य रेखांशाप्रमाणे नुसतीच कल्पना नसून त्याच्याशी भौगोलिक आणि भौतिक परिणाम कसे निगडित आहेत हे या प्रयोगातून माझ्या लक्षात आलं. काडीचं विरुद्ध दिशांनी गोलाकार भ्रमण हा प्रकार यदृच्छा किंवा स्वैर रीतीनं होत नसून त्याला शास्त्रीय पार्श्‍वभूमी आहे हे महत्त्वाचं.

मला त्या कृष्णवर्णीय गृहस्थाबद्दल सहानुभूती वाटली. तो फारसा शिकलेला वाटला नाही. बिचाऱ्याला अज्ञानामुळं आणि भाषेच्या मर्यादेमुळं या चमत्काराचं नीटसं स्पष्टीकरण देता आलं नसावं. पण एक महत्त्वाचा शास्त्रीय परिणाम त्यानं आमच्यापुढं उघड केला होता. काही जणांनी तो हातचलाखी करणारा आणि भोंदू असला पाहिजे अशी संभावना केली असली तरी मी त्याला एका बाजूला नेऊन काही पैसे त्याच्या हातावर ठेवले. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं आणि मलाही अभ्यासाला एक वेगळा विषय मिळाल्याचा संतोष झाला.

श्रीनिवास शारंगपाणी

Leave A Reply

Your email address will not be published.