महिला संघाने मालिका जिंकली

अँटिग्वा: कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने अखेरच्या एकदिवसीय सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
तिसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी स्मृती मानधनाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर 6 गडी राखून विजय मिळवला. स्मृतीला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली. विंडीजच्या निम्मा संघ माघारी परतला तेव्हा संघाचे शतक देखील फलकावर लागले नव्हते. यानंतर कर्णधार स्टेफनी टेलरचे अर्धशतक आणि अखेरच्या फळीत स्टेसी किंगने दिलेल्या साथीमुळे वेस्ट इंडिजला 194 धावांपर्यंत मजल मारली. टेलरने 79 धावा केल्या तर किंगने 38 धावांची खेळी केली. भारताकडून झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. त्यांना शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.

भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी 141 धावांची सलामी दिली. मानधनाने 74 तर रॉड्रीग्जने 69 धावा केल्या. या दोन्ही बाद झाल्यावर पूनम राऊत आणि कर्णधार मिताली राज यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

मानधनाने केले कोहलीला ओव्हरटेक

भारतीय महिला क्रिकेट संघाची अव्वल फलंदाज स्मृती मानधनाने कारकिर्दीतील 51 व्या एकदिवसीय सामन्यातील अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 2000 धावा करत मानधनाने संघाला वेस्ट इंडिजविरुद्धची मालिकाही जिंकून दिली.

स्मृती मानधनाने वेस्ट इंडिजविरुद्ध गुरुवारी झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 74 धावांची खेळी केली. दुखापत झाल्यामुळे मानधना पहिल्या दोन्ही सामन्यांत खेळू शकली नव्हती. 23 वर्षीय मानधनाने 51 डावांमध्ये 2000 धावा केल्या. सर्वात जलद 2000 धावा करणारी मानधना जगातील केवळ तिसरीच फलंदाज ठरली आहे. ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्‍लार्क आणि मेग लेनिंग ही अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. मानधनाने 51 सामन्यांत 43.08 च्या सरासरीने 2025 धावा केल्या आहेत. त्यात चार शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनच्या नावावरही सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने 48 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.