पाकिस्तानच्या विरोधी पक्षाच्या महिला नेत्या म्हणाल्या,”मोदी इम्रान खानचा फोन उचलत नाहीत आणि बायडेन…

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानच्या सरकारच्या कामकाजावर सध्या  विरोधी पक्षांनी जाहीर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्षाची जाहीर सभांमधून पोलखोल करताना विरोधी पक्षाचे नेते इम्रान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सडकून टीका करताना दिसत आहेत.

पाकिस्तानमधील मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या पीएमएल-एनच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज शरीफ यांनी आता भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. आयएसआय प्रमुखांची मुलाखत घेतल्याचे प्रकरणाने सध्या पाकिस्तानच्या राजकारणात एकच गोंधळ निर्माण केला  आहे. त्यावरुन मरियम यांनी इम्रान यांच्यावर टीका केली आहे.

“परराष्ट्र धोरणांमध्ये इम्रान खान अपयशी ठरलेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इम्रान यांचा फोन उचलत नाही तर अमेरिकन राष्ट्रायक्ष जो बायडेन हे त्यांना फोन करत नाहीयत,” असे म्हणत मरियम यांनी इम्रान यांच्यावर जाहीर भाषणामधून टीका केल्याचे वृत्त पाकच्या एका  वृत्तपत्राने दिलंय.

फैसलाबादमधील धोबीघाट मैदानामधील जाहीर सभेत दिलेल्या भाषणामध्ये इम्रान खान यांनी केवळ एक आश्वासन पूर्ण केल्याचे मरियम म्हणाल्या. प्रत्येक व्यक्तीला रडवण्याचं आश्वासन त्यांनी पूर्ण करुन दाखवलं. आज संपूर्ण देश रडत आहे, असा टोला मरियम यांनी लगावला. “अमेरिकन वृत्तवाहिन्यांवरील लोकांच्या वक्तव्यानुसार इम्रान खान यांची खरी सत्ता इस्लामाबादमधील महापौरापेक्षा अधिक नाही,” असेही मरियम म्हणाल्या. तसेच इम्रान खान सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन मरियम यांनी जनतेला केले.

इम्रान खान सत्तेत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा करावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळामध्ये मागील काही वर्षांपासून सुरु आहे. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही इम्रान खान आणि मोदी यांच्यात प्रत्यक्षात संवाद झालेला नाही.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून अजून इम्रान यांच्याशी थेट चर्चा केलेली नाही. सत्तेत आल्यानंतर बायडेन यांनी लहान मोठ्या अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केलीय. या संदर्भात इम्रान यांनीही अनेकदा थेटपणे नाराजी व्यक्त केलीय. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच याबद्दल बोलताना, बायडेन हे फार व्यस्त असतात त्यामुळे त्यांनी अजून एकही कॉल केला नसेल, असे म्हटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.