पुणे : सिंहगड रस्त्यावर घरामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ससून रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदन अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
यानंतर सिंहगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणी सुनिल चवले(35,रा.रायकरमळा, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
13 मार्च रोजी ती घरामध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिचा गळा आवळून खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत महिलेचा पती एका खासगी कंपनीत कामाला आहे.
तर तीची दोन्ही मुले घटनेच्या दिवशी शाळेत गेली होती. पती कामावरुन घरी आल्यावर पत्नी घरामध्ये फरशीवर पडलेली दिसली. त्याने तातडीने तीला रुग्णालयात दाखल केली.
मात्र तेथे ती मृत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना सुरवातीला तीने आत्महत्या केली असल्याचा संशय होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ताकवले करत आहेत.